Share

वंदे मातरम् वाद: ‘लग्नानंतरच इस्लामची आठवण आली का?’; मुकेश खन्नांचा शर्मिला टागोर यांच्यावर हल्लाबोल

‘वंदे मातरम्’च्या गायनावरून शर्मिला टागोर यांनी केलेल्या विधानावर मुकेश खन्ना संतापले असून, त्यांनी थेट टागोर यांच्या लग्नाचा संदर्भ देत टीका केली आहे.

Published On: 

Mukesh Khanna on Sharmila Tagore Vande Mataram

मुंबई– ‘वंदे मातरम्’ वरून मनोरंजन विश्वात आता एक नवा संघर्ष उभा राहिला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी ‘वंदे मातरम्’ संदर्भात नुकत्याच केलेल्या एका विधानावरून ‘शक्तिमान’ आणि ‘महाभारत’ फेम अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. “लग्नासाठी तुम्ही आयशा बेगम झालात, पण आता अचानक तुम्हाला इस्लामची आणि इतर धर्मांची एवढी काळजी का वाटू लागली?” असा जळजळीत सवाल करत खन्ना यांनी टागोर यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि त्यांच्या या भूमिकेमागील हेतूंवरच बोट ठेवलं आहे.

नुकतंच माध्यमांमध्ये शर्मिला टागोर यांचं एक वक्तव्य नव्याने चर्चेत आलं होतं. भारताच्या धार्मिक विविधतेचा विचार करता ‘वंदे मातरम्’च्या केवळ सुरुवातीच्या ओळीच गायल्या जाव्यात, असं मत त्यांनी मांडलं होतं. यामागील कारण सांगताना त्या म्हणाल्या होत्या की, पुढच्या कडव्यांमध्ये अनेक देवी-देवतांचा उल्लेख आहे, जो एकाच ईश्वराला मानणाऱ्या आणि मूर्तीपूजेला विरोध करणाऱ्या धर्मांना अडचणीचा ठरू शकतो. या विधानावरून इंटरनेटवर आधीच तीव्र संताप व्यक्त होत होता. त्यातच आता मुकेश खन्ना यांनी या वादात उडी घेत टागोर यांच्या या भूमिकेचा अतिशय कठोर शब्दांत समाचार घेतला आहे.

Mukesh Khanna on Sharmila Tagore Vande Mataram

‘लग्नानंतरच तुम्हाला इस्लाम दिसला का?’

मुकेश खन्ना यांनी शर्मिला टागोर यांच्या विधानाचा समाचार घेताना थेट त्यांच्या मन्सूर अली खान पतौडी यांच्यासोबतच्या लग्नाचा आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या धर्मांतराचा संदर्भ दिला. प्रसारमाध्यमांशी बोलताना खन्ना आक्रमक शैलीत म्हणाले, “तुम्हाला लग्नानंतरच समजलं का की इस्लाम नावाचाही एक धर्म अस्तित्वात आहे? जेव्हा तुम्ही बेगम झालात, तेव्हा तुम्हाला कळलं का की मुस्लिमांचा धर्म आणि त्यांच्या श्रद्धा वेगळ्या आहेत? तुम्ही स्वतःच्या लग्नासाठी आयशा बेगम झालात, पण आज तुम्ही पूर्णपणे आयशा बेगम या भूमिकेतूनच बोलत आहात.” खन्ना यांच्या या विधानामुळे आता सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.

याशिवाय, शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांच्या बंगाली संस्कारांची आठवण करून देत खन्ना यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. “तुम्ही बंगालमध्ये लहानाचे मोठे झालात, जिथे कालीपूजेचा एवढा मोठा आणि भव्य उत्सव असतो. तुम्ही बंगाली संस्कृती, तिथली परंपरा आणि चित्रपटांमध्ये वाढलात. मग संपूर्ण आयुष्य हिंदू संस्कृतीच्या सान्निध्यात घालवल्यानंतर, आता अचानक म्हातारपणी दुसऱ्या धर्माचे लोक हे स्वीकारणार नाहीत, अशी अनावश्यक चिंता तुम्हाला का वाटू लागली?” असा थेट सवाल खन्ना यांनी उपस्थित केला.

दुसरीकडे, हिंदू धर्मातील ३३ कोटी देव या संकल्पनेवरील अनेक गैरसमजही खन्ना यांनी या निमित्ताने दूर करण्याचा प्रयत्न केला. सनातन धर्मात ईश्वर एकच आणि निराकार आहे. हिंदू धर्मात ३३ कोटी देवी-देवता आहेत, याचा अर्थ ३३ कोटी देव आहेत असा अजिबात होत नाही. भाविक केवळ त्यांच्या वैयक्तिक श्रद्धेनुसार राम, शिव, हनुमान किंवा कृष्णाच्या रूपात त्या एकाच ईश्वराला पाहतात, असं सविस्तर स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

थोडक्यात सांगायचं तर, ‘वंदे मातरम्’ला विरोध करणं किंवा तो गाण्याला नकार देणं हे केवळ व्होटबँक आणि लांगूलचालनाच्या राजकारणाचा भाग असल्याचा गंभीर आरोप मुकेश खन्ना यांनी केला आहे. देशाच्या राष्ट्रीय प्रतीकांना अशा प्रकारे धार्मिक चौकटीत अडकवण्याला त्यांनी विरोध दर्शवला असून, देशाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी कोणत्याही धर्माचा अडसर येऊ शकत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. यावरून आता बॉलिवूडमध्ये दोन गट पडल्याचं चित्र स्पष्ट दिसत असून हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही