Share

सुपर अल-निनो म्हणजे समस्याही सुपर !- प्रशांत दैठणकर

बदलत्या हवामानामुळे आणि अल निनोच्या संकटामुळे महाराष्ट्रात १९७२ पेक्षाही गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Published On: 

El Nino Crisis

छत्रपती संभाजीनगर- आपल्या देशात 1972 साली सर्वात मोठा दुष्काळ पडला होता. त्याकाळी हवामानाचा वेध घेण्यासाठी उपग्रह यंत्रणा तसेच वातावरणात होणारे बदल याची माहिती जवळपास नव्हती. दुष्काळ आला इतकच ज्ञान सर्वांना होतं . आता बदलत्या तंत्रामुळे एल निनो अन् सूपर अल निनो (El Nino) याची माहिती खूप आधी आपणास झाली आहे. 1972 सालचा दुष्काळ सर्वांना यासाठी स्मरणात आहे की, त्याकाळी मोठ्या प्रमाणावर अन्नटंचाई निर्माण झाली होती.

शेतीचे उत्पादन नगण्य झाल्याने खाण्यासाठी धान्य नाही अशी स्थिती असल्याने अमेरिकेतून आपणास धान्य मागवावे लागले होते. नंतरच्या काळात तांत्रिक आणि यांत्रिक प्रगती झपाट्याने झाली असली तरी समस्या कमी झालेली नाही. उलट समस्येचे स्वरूप खूप बदलले आहे आणि गंभीर झाले आहे. याची आपणास जाणीव असणे गरजेचे आहे.

1971 साली भूजल उपशाचे प्रमाण नगण्य होते आणि लोकसंख्या देखील मर्यादित होती. मात्र गेल्या 5 दशकात शहरीकरण झपाट्याने झाले आणि लोकसंख्या देखील झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे यावेळी पिकांचे संकट अधिक पेयजलाचे संकट असे दुहेरी संकट आपणासमोर आहे.

यांत्रिकीकरणात झालेली वाढ आणि ऊस, कापूस या सारख्या नगदी व नफा देणाऱ्या पिकांकडे शेतकरी वर्ग वळला, यामुळे भूजल ऊपसा प्रचंड प्रमाणात सुरू आहे. धरणे जरी बांधली गेली असली तरी त्या धरणाच्या पाण्याचा वापर उद्योग , कृषी आणि पेयजल असा विभागला आहे. नागरिकांच्या पेयजलाची काळजी घेण्यासाठी ठराविक क्षमतेनंतर कृषीला अर्थात सिंचनाला पाणी दिले जात नाही. सध्या दोन नक्षत्रे कोरडी गेली असल्यानं हे संकट अधिक गहिरं झालं आहे.

शेतकऱ्यांना निसर्ग जणू नाराज आहे आणि दुसऱ्या बाजूला आता सिंचनासाठी पाणी न देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अक्षरश: आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

अल-निनो समजून घेताना त्याच्या तांत्रिक बाबीत सांगता येईल की, प्रशांत महासागरात पाण्याचे तापमान सुमारे 2 अंश सेल्सिअस वाढल्याने संपूर्ण निसर्गचक्र बदलले आहे.

नेमेची येतो पावसाळा-

असं आपण म्हणतो पण यंदा त्याचा नेम चुकलाय आणि तो कधी आणि किती येईल हे सांगणे अवघड झालय. आलाच पाऊस तर नेमकेपणाने तो कुठे, कधी आणि किती पडेल हा देखील सवाल आहे. अशा पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाला सातत्याने हवामान खात्याचा इशारा बघा, माहिती घ्या आणि पेरणी करण्याबाबत घाई करू नका असा झाला आहे.

अल निनोची स्थिती निसर्गत: दर काही काळाने येते मात्र त्याचं गांभीर्य वाढत आहे याचं एकमेव कारण म्हणजे आपण चालवलेला नैसर्गिक संसाधनांचा गैरवापर होय.

मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड ही जगासमोरील एक मोठी समस्या आहे. सोबतच जंगलांना लागणारी आग अर्थात वन-वणव्यात नष्ट होणारी जंगले यामुळे पृथ्वीवरील वृक्षाच्छादन झपाट्याने घटताना दिसत आहे.

2015 च्या फ्रान्स करारानुसार कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा निर्णय झाला परंतु यातून अमेरिकेने माघार घेतली. त्यासोबतच जगभरात जिवाश्म इंधन अपरिमितरित्या वापरले जात आहे. यातून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचा परिणाम वैश्विक पातळीवर होत आहे.

मोठमोठ्या हिमनद्या तसेच अर्क्ट्रीक व अंटार्टिका मधील बर्फ वेगाने वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. याचा धोका थेट पूर्ण पर्यावरणास आहे. आपण आपल्या महत्वाकांक्षा आणि पैशाच्या बळावर नैसर्गिक संसाधनं ओरबाडत आहोत, असेच म्हणावे लागेल.

पाऊस कमी, दुष्काळ, पाऊस जास्त, अतिवृष्टी, आणिबाणीची स्थिती हे एक चक्र आहे. शासन यात दिलासा नक्की देत आहे पण निसर्ग हा निसर्ग आहे.

_Nature is biggest leveler _… अशी उक्ती आहे. निसर्ग कोपला तर काय यावर डिस्कव्हरी वाहिनीने Raging Planet नावाची मालिका बनवली आहे ती आपण बघितली पाहिजे.

आपण निसर्गाचाच एक घटक आहोत, आधी बुद्धीमत्ता आणि आता आलेली कृत्रिम बुद्धीमत्ता यांच्या बळावर आपण निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. परंतु हे सर्व प्रयत्न एका फटक्यात आपणास काय स्थितीत नेवून पोहोचवतील याचाही अंदाज हवा आणि जाणीव हवी. आपण निसर्गाचं खूप काही देणं लागतो.

पुढच्या पिढीलाही वसुंधरा सुखरूप देणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण एक सुरेख ब्लु प्लॅनेट Blue Planet नव्या पिढीला देणार की एक Raging (खवळलेला) Planet याचाही निर्णय आपणास घ्यायचा आहे.

अल निनोच्या संकटावर मात करताना आगामी काळात प्रत्येकाने आपली भूमिका समजून आपले कर्तव्य मानून योग्य कृती न केल्यास काळ कठीण आहे. वेळीच सावध व्हा…! अद्याप सुरूवातच झालीय पण उशीर झालेला नाही.

लेखक – प्रशांत दैठणकर 9823199466

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही