पैठण | किरण काळे पाटील : आठ फूट खोल खड्ड्यात मजुरांना कोणतीही सुरक्षा न देता कामाला लावणं म्हणजे मृत्यूच्या दाढेत ढकलण्यासारखंच आहे. पैठण तालुक्यातील इसारवाडी शिवारात असाच एक संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. सुरक्षेचा कोणताही उपाय न केल्याने एका मजुराला आपला जीव गमवावा लागलाय, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे.
जायकवाडी धरण परिसरात सुरू असलेल्या बिडकीन डीएमआयसी (Bidkin DMIC) च्या पाईपलाईनच्या कामावर हा गंभीर अपघात घडला. कामाच्या ठिकाणी मातीची मोठी धडी अंगावर कोसळून रेवननाथ आबाजी बोबडे या मजुराचा गुदमरून मृत्यू झाला. याप्रकरणी जगदंबा एंटरप्रायजेसचे मालक आणि ठेकेदार यांच्यावर एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सुरक्षेशी खेळ: ना हेल्मेट, ना विमा!
पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, २७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास हे मजूर पाईपलाईनसाठी खणलेल्या जवळपास आठ फूट खोल नालीत काम करत होते. रेवननाथ बोबडे हे नालीत उतरून पाईपला ग्रीस लावत होते. अचानक खड्ड्याच्या बाजूची मातीची मोठी धडी त्यांच्या अंगावर कोसळली. यात मातीखाली दबून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासोबत काम करणारा नकुल बाबासाहेब शेळके हा तरुणही या ढिगाऱ्याखाली दबला गेला.
या अपघातात नकुल शेळके याच्या डाव्या कमरेचे आणि पायाचे हाड मोडले असून त्याच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तब्बल चार महिने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर, प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यावर नकुलने २१ ऑगस्ट रोजी पोलिसांत धाव घेत ही फिर्याद दिली.
सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, ठेकेदार दत्ता विठ्ठल अवधुत आणि मालक विठ्ठल भानुदास अवधुत (दोघे रा. बोरगाव, ता. पैठण) यांनी या मजुरांना सेफ्टी हेल्मेट, जॅकेट किंवा शूज असं कोणतंच सुरक्षा साहित्य दिलं नव्हतं. तसेच या कामगारांचा कोणताही विमादेखील काढलेला नव्हता.
जिवाचा धोका असल्याची पूर्ण कल्पना असतानाही मालक आणि ठेकेदाराने हा घोर निष्काळजीपणा केल्याचे तक्रारीत उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०६(१) आणि १२५(b) नुसार सदोष मनुष्यवध व निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक कविता जगताप यापुढील तपास करत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- बिडकीनमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा अभूतपूर्व उत्साह! भव्य जलूसमध्ये तरुणाईचा लक्षणीय सहभाग
- संशयाचं भूत मानगुटीवर! चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा गळा आवळून खून
- नेपाळमध्ये महाप्रलय! 62 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक बेपत्ता; भारतालाही धोका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











