अंतरवाली सराटी, 13 सप्टेंबर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुंबईतील मराठा मोर्चात आपल्यावर गोळ्या झाडण्याचा कट रचला जात असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी रविवारी अंतरवाली सराटी येथे बोलताना केला. आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसून, 19 सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर उपोषणाला बसणारच, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मोर्चामध्ये स्वतःची माणसे घुसवून गोंधळ निर्माण करायचा आणि त्या गर्दीत आपल्याला मारायचे, असा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. भाजप आणि शिंदे गटाचे मराठा आमदार समाजातील लोकांना फोन करून मोर्चाला न जाण्यासाठी दबाव आणत असल्याचा दावाही त्यांनी केला. ‘मराठ्यांना न मारता फक्त मला संपवण्याचा त्यांचा बेत आहे, पण मी मरण पत्करेन मात्र शरण जाणार नाही,’ अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.
मनोज जरांगे यांचे 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषण
आगामी 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. आपण कायद्याचा आदर करत असून, या उपोषणासाठी रीतसर परवानगी मागितल्याचे त्यांनी सांगितले. ‘परवानगी द्यायची की नाही, हे आता देवेंद्र फडणवीस यांनी ठरवावे. माझी काय चूक आहे? मी कायद्याचे उल्लंघन करत आहे का? तुम्हाला अटी घालायच्या असतील तर खुशाल घाला,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी जरांगे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही बोचरी टीका केली. ‘बावनकुळे हे महिलांच्या आडून वार करतात. आमच्या नादाला लागू नका, दुसऱ्या राज्यापर्यंत आमचे हात पोहोचलेले आहेत आणि केंद्रातही आमचे मंत्री आहेत. इथल्या दोन-चार मंत्र्यांना आम्ही सहज अडचणीत आणू शकतो,’ असा थेट इशारा त्यांनी दिला. तसेच, मराठा बांधवांना भावनिक साद घालत, ‘तुम्हाला भीती वाटत असेल तर घरात बसा, पण मुंबईला या आणि त्यानंतर थेट माझ्या अंत्ययात्रेलाच या,’ असे आवाहन त्यांनी केले.
एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्वी आपला विश्वास होता, वाशीमधून आपण त्यांचा सन्मान करत जीआर घेऊन आलो होतो, याची आठवण त्यांनी करून दिली. मात्र, ‘जर देवेंद्र फडणवीस यांनीच सर्व मागण्या मान्य करून बाजी मारली, तर मग बाकीच्यांचे (शिंदे गटाचे) काय होणार?’ असा राजकीय प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला. चौकश्यांचा ससेमिरा लावला तरी आपण घाबरणार नाही आणि मुंबईत स्टेजवर रक्त सांडले तरी माघार घेणार नाही, यावर ते ठाम आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- मराठा आंदोलनाला मदत करणाऱ्यांची चौकशी; बावनकुळे ‘बाईच्या पदराआड’ लपून वार करत असल्याचा मनोज जरांगेंचा आरोप
- अभिजीत दिपके यांचा मध्य प्रदेशच्या ‘मुख्यमंत्री’ पदाचा राजीनामा; बालाघाटमधील वादानंतर सरकारला टोला
- सीबीआयची मोठी कारवाई; एक कोटींच्या लाचप्रकरणी CGST अधीक्षकासह सल्लागाराला अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











