Urvashi Rautela On Tiranga Dress: देशाच्या अभिमानाचं प्रतीक असलेल्या तिरंग्याला फॅशनचा रंग चढवणं देशप्रेम की थेट देशाचा अपमान? सध्या सोशल मीडियावर हाच एक मोठा प्रश्न विचारला जातोय. निमित्त ठरलंय अभिनेत्री उर्वशी रौतेला!
नुकतंच जयपूरच्या झी स्टुडिओमध्ये ‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२६’ (Miss Universe India 2026) चा दिमाखदार सोहळा पार पडला. या स्पर्धेत परीक्षक म्हणून आलेल्या उर्वशीने चक्क तिरंग्यापासून प्रेरित असा एक मोठा गाऊन घातला होता. हाच ड्रेस आता एका नव्या वादाचं कारण बनला आहे.
Urvashi Rautela Tiranga Dress Controversy
२३ ऑगस्टला झालेल्या या ग्रँड फिनालेमध्ये भारताच्या पहिल्या मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनसह अनेक दिग्गज उपस्थित होते. यावेळी उर्वशीने परिधान केलेला तिरंगा गाऊन जमिनीवर लोळत होता. यामुळेच नेटकरी चांगलेच भडकले.
सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. “हा देशाच्या शानसोबत कसला भद्दा मजाक आहे?” असा संतप्त सवाल एका युझरने विचारला. दुसरीकडे, एकाने थेट कायदेशीर बाजू मांडली. भारताच्या ध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वजाचा वापर कपडे म्हणून करणं बेकायदेशीर असल्याचं अनेकांनी निदर्शनास आणून दिलं.
‘राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१’ च्या कलम २ नुसार, तिरंग्याचा वापर कंबरेखालील कपड्यांसाठी करता येत नाही. तसंच, झेंडा जमिनीला स्पर्श करू नये, असा स्पष्ट नियम आहे. उर्वशी कायदेशीर अडचणीत अडकणार का? अशी चर्चा सुरू झाली.
पण, या सगळ्या गदारोळात उर्वशीने गप्प न बसता थेट स्पष्टीकरण दिलं आहे. “मी माझ्या देशाला फक्त राष्ट्रीयत्व म्हणून नाही, तर माझ्या ओळखीचा एक भाग म्हणून पाहते,” असं उर्वशी म्हणाली. हा ड्रेस केवळ तीन रंग एकत्र करणं नव्हतं. तर, ही एक राष्ट्रीय भावना कलात्मक पद्धतीने मांडण्याची पद्धत होती. त्यामुळेच तिने हा पेहराव निवडला.
वादावर बोट ठेवत तिने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. “हा गाऊन म्हणजे भारताच्या राष्ट्रध्वजाची हुबेहूब कॉपी नाही. यात आणि मूळ तिरंग्यात खूप फरक आहेत,” असा दावा तिने केला. या ड्रेसमधील केशरी आणि हिरव्या रंगाच्या छटा वेगळ्या आहेत. मध्यभागी असलेलं चक्र हे दागिन्यासारखं वापरलंय. रंगमंचावरील दिव्यांच्या प्रकाशात तो एक फॅशनचा भाग वाटावा, यासाठी हे जाणीवपूर्वक केल्याचं तिने स्पष्ट केलं.
बेलारूसच्या डिझायनर दारिया चेरमाशेंतसेवा हिने हा गाऊन तयार केला असून, त्यासाठी तब्बल तीन महिने लागले होते. आता उर्वशीने बाजू मांडली असली तरी, हा वाद पूर्णपणे शमणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘सस्ती कॉपी’ आणि संस्कारांवरून वाद, अखेर तापसी पन्नूने सुनावले खडेबोल
- Kriti Sanon: ‘संस्कृती हृदयात असते, नेकलाईनमध्ये नाही’; कृती सॅननने ट्रोलर्ससह कंगनालाही सुनावलं
- ओबीसी नेतृत्वात फूट? लक्ष्मण हाकेंच्या 1 सप्टेंबरच्या मोर्चाला बबनराव तायवाडेंचा विरोध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










