Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आज नाशिक (Nashik) दौरा होता. दौऱ्यादरम्यान, त्यांनी शहरातील रस्त्यांची दुरवस्था, प्रशासनाचा कारभार आणि आगामी कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela) पार्श्वभूमीवर केली जाणारी वृक्षतोड या मुद्द्यांवरून राज्य सरकारवर कडक टीका केली.
नाशिक कुंभमेळ्यासाठी गुजरातहून कंत्राटदार आणले गेल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. तसेच प्रत्येकाला केवळ स्वतःच्या कमिशनचीच चिंता आहे, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले.
राज ठाकरे यांनी आता पर्यंत झालेल्या कुंभमेळ्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, “मी असताना आत्तापर्यंत दोन कुंभमेळे इथे झालेत. एक 2003 साली आणि एक 2015 साली. 2015 च्या कुंभमेळ्यात नाशिकमध्ये जी काही कामे झाली आणि ज्या प्रकारे कुंभमेळा झाला, नाशिक शहरालादेखील कळले नव्हते की, कुठे काय कामे सुरू आहेत आणि कशा प्रकारची कामे सुरू आहेत. ती कामे झाल्यानंतर सर्वांना दिसले की रस्त्याचे कामे कसे झाले आहेत.”
Raj Thackeray criticizes on Nashik Kumbh Mela
पुढे बोलताना म्हणाले की, “त्या कुंभमेळ्यातून पैसे काढणे, अर्थकारण हा उद्देश नाही, त्यामुळे तो खूप सोप्या आणि चांगल्या पद्धतीने झाला. पण, आता मला दिसत आहे की, संपूर्ण शहरात खड्डे पडले आहेत. लोकांचे बळी गेले आहेत, पण या प्रशासनाला त्याचे काही पडले नाही. प्रशासन ढिम्म आहे. प्रशासनाला माणसे गेल्याचे काहीच सोयरसुतक पडलेले नाही. फक्त कामातून आपले कमिशन कसे मिळेल, हे बघत आहेत,”
“या कुंभमेळ्यासाठी अनेक कॉन्ट्रॅक्टर गुजरातमधून आणल्याचे समजले. महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्टर जन्मलेच नाहीत का? वरून जे आदेश येतील तसे कुंभमेळे करायचे.” असा संताप ठाकरे यांनी व्यक्त केला.
कुठे गेली ती स्मार्ट सिटी?
“महाराष्ट्रातील सगळ्या गोष्टी अशाच हाताळल्या जात असतील तर यांना लखलाभ असो. त्या वेळेला आम्ही इतके सुंदर नाशिक केले. त्याची दुर्दशा बघून वाईट वाटते. बोटॅनिकल गार्डन असेल किंवा बाळासाहेबांच्या नावाने केलेले म्युझियम असेल, दुसऱ्याने केले आहे म्हणून त्याची वाट लावायची. स्मार्ट सिटीची घोषणा केली होती. त्याचे काय झाले कुठे गेली ती स्मार्ट सिटी?,” असा सवाल राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केला आहे.
राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये झालेल्या कामाबाबत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, “देशाच्या कुठल्याही शहरात तुम्हाला काही दिसत नाही. सगळे शहर बरबाद होत आहे. ज्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जात आहेत. त्या फ्रॉड पद्धतीने हाताळल्या जात आहेत, हे लोकांनादेखील माहिती आहे.”
‘…तर भोगा आता’
“परंतु जे मतदान करत आहेत, त्यांनीदेखील या गोष्टीचा विचार केला पाहिजे. नाशिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत. त्यावर इतकी आंदोलने झाली, पण त्याचा काही फायदा नाही. प्रशासन ढिम्म आहे. ज्यावेळी निवडणुका झाल्या, तेव्हा लोक भाजपला निवडून देत असतील तर भोगा आता, अजून काय बोलू शकतो मी.” असे म्हणत राज ठाकरे यांनी नाशिककरांना खडेबोल सुनावले.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘डिग्री चुलीत घालायच्या का?’ उद्योगासाठी तारण मागणाऱ्या बँकांवर सदाभाऊ खोतांचा सवाल
- ‘50 आमदार पाडणार असाल तर शुभेच्छा’; दरेकरांचे जरांगेंना ओपन चॅलेंज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












