🕒 1 min read
मुंबई : राज्यभरात सध्या स्मार्ट मीटर (Smart Meter) बसवल्यानंतर वीजबिलात अचानक मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. स्मार्ट मीटरमुळेच बिलं वाढली आहेत, असा सूर सर्वसामान्यांमधून उमटत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या संभ्रमावर पडदा टाकत यामागील खरं कारण स्पष्ट केलं आहे. वीजबिल वाढण्यामागे स्मार्ट मीटरमध्ये कोणताही दोष नसून वाढलेला वीज वापर आणि आपल्याकडील ‘टेलिस्कोपिक’ वीज दरवाढ पद्धत कारणीभूत असल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यांनी सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत १ बीएचके (1 BHK) आणि २ बीएचके (2 BHK) घरांच्या वीज वापराचं गणित समजावून सांगितलं.
यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे आणि उष्णतेच्या लाटेमुळे घराघरांमध्ये विजेचा वापर प्रचंड वाढला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन उदाहरणांद्वारे ही दरवाढ कशी झाली ते उलगडून सांगितले आहे: साधारण १ बीएचके घरात दीड टनाचा एक एसी, एक फ्रीज आणि पंखे असतात. अशा घरांचे नेहमीचे मासिक बिल साधारण २७० युनिट्स पर्यंत येत होते. मात्र, यंदाच्या प्रचंड उकाड्यामुळे एसी आणि पंखे जास्त काळ चालल्याने याच घरात २७० ऐवजी ४१५ युनिट्स वीज वापरली गेली. पर्यायाने, मासिक बिल थेट अडीच हजार रुपयांवरून ५,००० रुपयांवर गेले. २ बीएचके घरात सरासरी वीज वापर ४२५ युनिट्सच्या आसपास असतो. उन्हाळ्यामुळे हा वापर वाढून थेट ६५५ युनिट्सवर पोहोचला. युनिट्स वाढल्यामुळे या घरांचे नेहमीचे ४,५०० रुपयांचे बिल थेट ८,००० रुपयांवर गेले.
वापर थोडा वाढला तरी बिल थेट दुप्पट का होते?
वीज वापर काही युनिट्सने वाढला तरी बिल थेट दुप्पट का होते? यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ‘टेलिस्कोपिक’ वीज दर रचना समजून सांगितली. आपल्या राज्यात विजेचा वापर जसा वाढतो, तसा प्रति युनिटचा दरही टप्प्याटप्प्याने महाग होत जातो. ३०० युनिट्सपर्यंत सरकार सर्वसामान्यांना तुलनेने स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देते. वीज वापर ३०० युनिट्सच्या वर जाताच, प्रति युनिट दरात थेट ५ रुपयांची मोठी वाढ होते. तसेच वीज वापर ५०० युनिट्सच्या वर गेल्यास, दरात आणखी २ रुपयांची वाढ होते.
यामुळेच, १ बीएचकेमध्ये ३०० युनिटची मर्यादा ओलांडून ४१५ युनिट वापर झाल्यामुळे आणि २ बीएचकेमध्ये ५०० ची मर्यादा ओलांडून ६५५ युनिट वापरल्यामुळे बिलाची रक्कम थेट दुप्पट झाली, असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट शब्दात गणित मांडले.
स्मार्ट मीटर की कडक उन्हाळा? नेमकं कारण काय?
वाढलेल्या बिलांचा आणि स्मार्ट मीटरचा कोणताही थेट संबंध नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. ज्या भागांमध्ये अजून स्मार्ट मीटर बसवलेले देखील नाहीत, तिथेही नागरिकांना अशीच वाढीव बिलं आली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यंदाचा वाढलेला उन्हाळा आणि हीट वेव्हमुळे (उष्णतेची लाट) एसी, कुलर आणि पंख्यांचा वापर जास्त वेळ करावा लागल्याने ज्यांच्याकडे स्मार्ट मीटर नाही, त्यांचेही वीज बिल वाढल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- भेसळखोरांना थेट मृत्युदंड? मंत्री नरहरी झिरवळांचे मोठे विधान
- Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर; महायुती सरकारने सांगितले मोठे कारण
- ‘5 कोटींची ऑफर दिली जातेय!’ ठाकरे गटाचा गंभीर आरोप; नगरसेवक फुटीच्या चर्चांवर मोठा ट्विस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












