🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर । अजित पवार ( Ajit Pawar ) गटाच्या युवा नेत्याने तसेच संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील गरुड झेप अकॅडमीच्या मालकाकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा निंदनीय प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात गरुड झेप अकॅडमीचे संचालक निलेश सोनवणे ( Nilesh Sonwane ) यांनी चार खंडणीखोरांविरोधात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही दिवसापासून राजकीय गुंडांकडून सामान्य जनतेला मारहाण, उद्योजकांना धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत. आपले कोणीच काही करू शकत नाही, या भावनेने हे लोक सर्रास सामान्य जनतेला त्रास देत आहेत. काही दिवसापूर्वी या राजकीय गुंडांनी कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाला बेदम मारहाण करून, तुझ्या कुटूंबाला जिवंत मारून टाकतो, अशी धमकी दिली होती.
तसेच विनोद पाटलांना ( Vinod Patil ) छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची उमेदवारी मिळावी, म्हणून गरीब मराठयांना मराठा मंदीर येथे मारहाण केली होती. तसेच मराठा मंदीर येथील मराठा समाजाची ही बैठक उधळून टाकण्यासाठी अजित पवार गटाचे सचिन मिसाळ याने मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्याकडून १० लाख रुपये घेतल्याचा आरोप अंतरवाली सराटी येथील मराठा कार्यकर्त्यांनी यापूर्वी केलेला आहे. यावरून राजकीय गुंडांमागे कोणाचा वरदहस्त आहे हे स्पष्ट होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिन मिसाळ, अखिल भारतीय छावा संघटनेचे अशोक मोरे, संभाजी ब्रिगेडचे रमेश गायकवाड, रेखा वाहटुळे या खंडणी बहाद्दरांनी गरुड झेप अकॅडमीकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा निंदनीय प्रकार उघडीस आला आहे.
गरुडझेप अकॅडमी प्रकरण काय आहे ?
गरुडझेप अकॅडमीतील एका विद्यार्थिनीने काही दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा आधार घेत आरोपीने गरुडझेप अकॅडमीविरोधात पोलीस आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, धर्मादाय आयुक्त, पोलीस स्टेशन इत्यादी ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. सदर प्रकरण कोर्टात न्याय प्रविष्ट असताना आरोपी अकॅडमीविरोधात तक्रारी देत होते.
अकॅडमीविरुद्ध तक्रारी थांबवायच्या असल्यास संघटनेला निधी द्यावा लागेल. पैसे दिले नाहीत तर आम्ही तुमच्या संस्थेची बदनामी थांबवणार नाही. तसेच अकॅडमीची बदनामी थांबवायची असेल तर तुम्हाला २५ लाख रुपये द्यावे लागणार असल्याचे आरोपींनी निलेश सोनवणे यांना फोन करून सांगितले.
यावर सोनवणे यांनी एवढे पैसे नाहीत, सात लाख रुपये देतो असे सांगितले. यावर सर्व आरोपींनी आकाशवाणी येथील हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. यावर तडजोडी नंतर ऍडव्हान्स दोन लाख रुपये देण्याचे ठरलं. दोन लाख रुपये देतानाचा व्हिडिओ सोनवणे यांनी रेकॉर्ड केला आहे. पैसे दिल्यानंतर तक्रार मागे घेण्याची हमी सोनवणे यांनी खंडणी बहाद्दरांनीकडून घेतली.
या खंडणी प्रकरणात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अशोक मोरे, सचिन मिसाळ, रमेश गायकवाड, रेखा वहाटुळे ( Rekha Wahatule ) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपींची क्लासेसमध्ये घुसून तोडफोड
आकाशवाणी परिसरामध्ये ( छत्रपती संभाजीनगर ) असलेल्या आकाश क्लासेस मध्ये घुसून या आरोपींनी चार दिवसापूर्वी क्लासेसची तोडफोड केली होती. या तोडफोडीमध्ये क्लासेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या घडलेल्या प्रकारामुळे शहरातील सर्व शैक्षणिक संस्था दबावात आहेत. क्लासेस तोडफोड प्रकरणात जीन्सी पोलीस ठाण्यामध्ये राजकीय गुंडा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील छोटे मोठे उद्योग, शैक्षणिक संस्था चालक, हॉस्पिटल अशा सामाजिक संघटनांच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या गुंडाच्या हैदोसाने त्रस्त आहेत. खंडणी खोरांमुळे अनेक संस्था, उद्योग हॉस्पिटल शहरातून पळ काढत आहेत. हा प्रकार थांबला पाहिजे, शहराचे नुकसान होऊ नये, यासाठी सामाजिक संघटनांच्या नावाने तक्रारी करून खंडणी वसूल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खंडणीखोरांना त्रस्त उद्योजक, हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था चालक यांनी पुढे येऊन खंडणीखोराविरुद्ध तातडीने संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन निलेश सोनवणे यांनी केले आहे.
खोट्या तक्रारी देऊन नागरिकांना धमकावणे
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिन मिसाळ ( Sachin Misal ), अखिल भारतीय छावा संघटनेचे अशोक मोरे ( Ashok More ), संभाजी ब्रिगेडचे रमेश गायकवाड ( Ramesh Gaikwad ) यांनी ४ एप्रिल २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर मध्ये कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाला बेदम मारहाण करत, जिवंत मारून टाकण्याची धमकी दिली होती. या विरोधात शिक्षकाने पोलिसांना तक्रार दिली होती. तक्रार मागे घे नाहीतर खोटी विनयभंगाची तक्रार दाखल करु अशी धमकी आरोपीकडून देण्यात आलेली होती. राजकीय दबाव आल्याने हे प्रकरण दाबून टाकण्यात हे गुंड यशस्वी झाले होते.
संभाजीनगर शहराचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि शहरातील महत्वाच्या व्यक्तींसोबतचे फोटो सोशल माध्यमांवर टाकून चमकोगिरी करत नागरिकांना धाक दाखवण्याचा प्रयत्न ही राजकीय गुंड प्रवृतीचे लोक करत आहेत.
या गुंड प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. न्याय मागण्याची वेळ उद्या तुमच्यावर ही येऊ शकते. सावध रहा, संघर्ष करा, एकजूट होण्याची मागणी सुज्ञ नागरिक करत आहेत. अन्याया विरोधात लढणे सर्वांची नैतिक जबाबदारी असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
वरिष्ठांना अंधारात ठेवून संघटनेच्या पत्राचा गैरवापर
तीन वेगवेगळ्या संघटना असताना देखील पत्र देताना एकच मजकूर वापरतात. तसेच, वरिष्ठांना अंधारात ठेवून संघटनेच्या पत्राचा गैरवापर एकत्र खंडणी मागण्यासाठी ही गुंड मंडळी करतात का? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या
- छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच ‘सुरत’ लुटली नाही – देवेंद्र फडणवीस
- शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी माफी मागून पंतप्रधानांनी चूक मान्य केली
- महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अवमान करणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












