Sharad Pawar | “आगामी निवडणुका…”; वंचितसोबतच्या युतीबाबत शरद पवारांची भूमिका स्पष्ट

Sharad Pawar | कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना अनेक विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाने युती केली असल्याची घोषणा शिवसेनेच्या ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. त्यावरुन वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत जाणार का? शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांच्यातील वाद मिटणार का? यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

शिवसेना आणि वंचित आघाडीच्या युतीनंतर प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्याने सेना आणि वंचितमध्ये आपापसात मतभेद असल्याचे चव्हाट्यावर आले. युतीनंतर दोनच दिवसांत संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात वाकयूद्ध झाल्याचे पाहायला मिळाले. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे भाजपचेच असल्याचे म्हटले होते, त्यावर राऊत यांनी आक्षेप घेतला होता. यानंतर आज शरद पवारांनी या युतीबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे.

“शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे काय चालले आहे, याची माहिती आम्हाला नाही. आम्ही त्या चर्चेत सहभागी नव्हतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी आघाडीची चर्चा झालेली आहे आणि पुढील निवडणुकीत आम्ही एकत्र सामोरे जाऊ, असे आमचे मत आहे”, असे शरद पवार म्हणाले आहेत.

“वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासोबत आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही, त्यामुळे आम्ही त्याची चर्चा करणार नाही. त्यांच्यासोबतच्या आघाडीचा प्रस्ताव आमच्यासमोर नसल्यामुळे कुणाला किती जागा वाटप होणार, यावर चर्चाच होऊ शकत नाही”, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button