छत्रपती संभाजीनगर (Illegal Sirens): कायदा खिशात घेऊन फिरणाऱ्या व्हीआयपी मंडळींना प्रशासनाचा धाक उरलाय की नाही? की नियम फक्त सर्वसामान्य माणसांसाठीच बनवलेत? हा प्रश्न आता थेट जनताच विचारू लागली आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात सध्या एक वेगळाच ट्रेंड आलाय. झेड ब्लॅक काचा असलेली गाडी त्यावर कुठेही नंबर प्लेट नाही आणि पोलिसांसारखा मोठा सायरन. लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचं हे नवं फॅड राजरोसपणे सुरू आहे. रविवारी मध्यरात्री बिडकीनच्या शेकटा फाट्यावर झालेली कारवाई याच आजाराचं एक छोटं उदाहरण आहे.
रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास बिडकीन पोलिसांची गाडी गस्तीवर होती. त्यावेळी त्यांना एक काळ्या रंगाची स्कार्पिओ सायरन वाजवत येताना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवली. गाडीच्या काचा पूर्ण काळ्याकुट्ट होत्या आणि विशेष म्हणजे गाडीवर प्रत्यक्ष कोणतीही नंबर प्लेट नव्हती.
पोलिसांनी आत बघितलं तर अरुण चव्हाण नावाचा तरुण चक्क चिलममध्ये गांजा ओढत बसला होता. पोलिसांनी त्याच्यावर एनडीपीएस (NDPS कलम 8(c) व 27) आणि मोटार वाहन कायद्याच्या (177, 119(2), 194(F), 100(2)) कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागदोपत्री गाडीचा नंबर एम.एच-२०-जी वाय-२९७१ असा नोंदवला गेला असला तरी, प्रत्यक्ष गाडीवर नंबरच नव्हता ही बाब गंभीर आहे. पण खरा प्रश्न हा आहे की, हा माज फक्त बिडकीनपुरता मर्यादित आहे का? नक्कीच नाही.
VIP संस्कृतीचा माज आणि प्रशासनाची डोळेझाक
थोडक्यात सांगायचं तर, हे लोण आता संपूर्ण जिल्ह्यात पसरलंय. पैठण असो वा छत्रपती संभाजीनगर शहर सगळीकडे हीच परिस्थिती आहे. अनेक आमदार, खासदार आणि त्यांचे कार्यकर्ते, इतकंच काय आताच निवडून आलेले नवखे झेडपीचे सभापती यांच्या गाड्या बघितल्या तर कुणालाही धक्का बसेल. बहुतांश कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर नंबर प्लेट्स नसतात. पूर्ण काळ्या काचा लावून ही वाहने शहरात सुसाट फिरतात. यामागे उद्देश काय? तर फक्त आपला रुबाब दाखवणं आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करणं. आपण कुणीतरी ‘भाई’ किंवा ‘मोठे साहेब’ आहोत, हे दाखवण्याचा हा अट्टाहास आहे.
पण प्रशासनाला हे दिसत नाही का?
सामान्य माणसाने चुकून सिग्नल तोडला. किंवा हेल्मेट घातलं नाही. तर त्याला लगेच चौकात अडवून ई-चलन फाडलं जातं. मग या व्हीआयपी लोकांचे सायरन पोलिसांना का ऐकू येत नाहीत? आता हेच बघा ना, काही दिवसांपूर्वीच चक्क जिल्हा न्यायालयासमोरून एका बड्या महिला आमदाराची गाडी सायरन वाजवत गेली. भर दिवसा आणि तेही जिथे न्याय मिळतो त्या न्यायालयाच्या उंबरठ्यावर नियम पायदळी तुडवले गेले.
आता या महिला आमदार कोण? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर एवढीच हिंट देतो की, यांचे वडील केंद्रात मंत्री होते आणि पतीही आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे त्या कोण हे तुम्ही नक्कीच ओळखलं असेल. सध्या आम्ही या बातमीत त्यांचं थेट नाव उघड करत नाहीये. कारण, पुढच्या वेळी तरी त्यांनी स्वतःहून या गोष्टीची काळजी घ्यावी, हाच यामागचा शुद्ध हेतू आहे.
बिडकीन पोलिसांनी जशी मध्यरात्री धडक कारवाई केली, तशीच कारवाई शहरातही राबवण्याची गरज आहे. विना नंबर प्लेट फिरणाऱ्या आणि सायरन वाजवून दहशत माजवणाऱ्या प्रत्येक गाडीवर कारवाई झालीच पाहिजे. नियम सर्वांसाठी सारखेच हवेत. जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघतेय. कधीतरी लोकांच्या संतापाचा उद्रेक नक्कीच होईल. प्रशासनाने वेळीच पावलं उचलली नाहीत, तर सामान्य माणसाचा कायद्यावरचा उरलासुरला विश्वासही उडून जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- अभिजीत दिपके पुन्हा आक्रमक; 5 सप्टेंबरला दिल्लीत मोठा मोर्चा
- वीरेंद्र सेहवागची कार्बन कॉपी! लेक आर्यवीरने मैदानात मारले बापासारखे फटके, व्हिडिओ व्हायरल
- लाडकी बहीण योजना: खात्यात १५०० रुपये जमा, पण ९२ लाख महिला वगळल्याने मोठा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











