National Turmeric Board: केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशात नवीन हळद उत्पादनांच्या विकास आणि संशोधनासाठी राष्ट्रीय हळद मंडळाची (National Turmeric Board) स्थापना केली असल्याची माहिती दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता हळद उत्पादक शेतकऱ्याला फायदा होणार आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, हे मंडळ हळदीच्या लागवडीशी संबंधित शेतकऱ्यांच्या कल्याणावर आणि चांगल्या जाती आणि निर्यातीवर लक्ष केंद्रित करेल. मंगळवारी दिल्लीमध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी मंडळाचे उद्घाटन केले आणि पल्ले गंगा रेड्डी यांची अध्यक्ष म्हणून घोषणा केली. तसेच मंडळाचे मुख्यालय तेलंगणामधील निजामाबाद येथे असणार असल्याची माहिती दिली.
माध्यमांशी बोलताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले की, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, मेघालय आणि इतर 20 राज्यांसह पसरलेल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे मंडळ विशेष लक्ष देणार आहे. आज जागतिक हळदीच्या व्यापारात भारताचा वाटा 62 टक्क्यांहून अधिक आहे. 2023-24 या वर्षात 226.5 दशलक्ष डॉलर्स किमतीची 1.62 लाख टन हळद आणि हळदीची उत्पादने निर्यात करण्यात आली.
केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये हळदीचे उत्पादन वाढवण्याची प्रचंड क्षमता आहे आणि हळदी मंडळाच्या स्थापनेमुळे देशातील हळद उत्पादकांचे उत्पन्न वाढेल. राष्ट्रीय हळद मंडळात विविध मंत्रालयांचे प्रतिनिधी, निर्यातदार आणि उत्पादक संघटनांचे प्रतिनिधी देखील असतील. अशी देखील माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच जागतिक हळदी उत्पादनात भारताचा वाटा 70 टक्क्यांहून अधिक आहे आणि येथे हळदीच्या 30 जातींचे उत्पादन घेतले जाते. असेही माहिती केंद्रीय मंत्री गोयल यांनी दिली.
National Turmeric Board Update
हळदीच्या आवश्यक आणि औषधी गुणधर्मांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आणि त्याचे उत्पादन वाढवण्याच्या आणि नवीन बाजारपेठांमध्ये व्यापाराला चालना देण्यासाठी लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी वाढविण्याच्या मार्गांवर देखील मंडळ विचार करणार असेही ते म्हणाले. तर 2023-24 या आर्थिक वर्षात भारतात 3.05 लाख हेक्टर क्षेत्रात हळदीची लागवड करण्यात आली आणि या काळात उत्पादन 10.74 लाख टन झाले असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :