🕒 1 min read
कोल्हापूर: ‘मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते करा’ अशी भूमिका सोशल मीडियावर मांडणारे व्यावसायिक सुशील केडिया यांच्या टिप्पणीमुळे राज्यात सुरू असलेल्या वादावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांनी अशा गोष्टींना अवाजवी महत्त्व देऊ नये, असे सांगत अजित पवार संतप्त झाले.
सुशील केडिया यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठी भाषेच्या आग्रहावर जोरदार टीका केली होती. “राज ठाकरे, याची नोंद घ्या की, मी मुंबईत गेल्या ३० वर्षांपासून राहतो. पण मला मराठी व्यवस्थित येत नाही. आता तुमचे यासंदर्भातले बेफाम गैरवर्तन पाहता मी हा पणच केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसाचे कैवारी म्हणून वावरत आहेत, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय बोला,” असे आव्हान त्यांनी दिले होते. या पोस्टनंतर अनेक राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया विचारण्यात आल्या होत्या.
Ajit Pawar Comment on Sushil Kedia
सुशील केडिया यांच्या पोस्टबद्दल प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) माध्यमांवरच संतापले. ते म्हणाले, “माध्यमांनी कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यावे, यालाही काही मर्यादा आहेत. संविधान, कायदा याप्रमाणे केडिया भारतीय नागरिक आहेत. भारतीय नागरिकाला कुठल्याही भागात जाऊन राहता येते, बोलता येते. व्यवसाय करता येतो किंवा जमीन खरेदी करता येते.”
“एखाद्या व्यक्तीने काही म्हटले असेल, तर त्याला एवढे रंगवून सांगायची काय गरज आहे का? मुंबईत असे अनेक लोक राहतात, ज्यांना दुर्दैवाने मराठी येत नाही. एखाद्या व्यक्तीला जर मराठी भाषा बोलताच येत नसेल, तर तो ‘येत नाही’ असे म्हणणारच ना… सर्वांना मराठी समजले पाहिजे किंवा मराठी भाषा बोलली गेली पाहिजे, असे मराठी माणसांना वाटणे चुकीचे नाही. पण त्यावर बळजबरी करता येणार नाही,” असे म्हणत त्यांनी ( Ajit Pawar ) स्पष्ट भूमिका मांडली.
अजित पवारांनी पुढे म्हटले, “केंद्र सरकारच्या काही कर्मचाऱ्यांची देशभरात बदली होत असते. एखादा अधिकारी तमिळनाडूहून मुंबईत आला, तर त्याला ताबडतोब मराठी कशी येणार? आपण भारतीय आहोत, ही भावना आपण मनात ठेवली पाहिजे. बाहेरच्या राज्यातील माणूस इथे व्यवसाय किंवा नोकरी करत असेल, तर त्याने स्थानिक भाषा शिकावी, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही. पण त्यावर बळजबरी करता येणार नाही.”
मोदींमुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा
“आपला देश अनेक जाती-धर्म-पंथात विखुरलेला देश आहे. अनेक भाषा आपल्या देशात बोलल्या जातात. प्रत्येक राज्याची मातृभाषा आहे. आपल्या मातृभाषेला म्हणजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी अनेक वर्ष आपण प्रयत्न करत होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयात लक्ष घालून मागच्या वर्षी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिला,” असे पवार म्हणाले.
📌 महत्वाच्या बातम्या
- एकनाथ शिंदेंनी ‘जय गुजरात’चं रहस्य उघड केलं! उद्धव ठाकरेंचा जुना VIDEO दाखवून विरोधकांनाच घेरलं!
- लव्ह, सेक्स अन् धोका! कोंढवा रेप केस मागचं सत्य उघड; बॉयफ्रेंडच निघाला ‘डिलिव्हरी बॉय’
- हिंदी जीआरची होळी करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल; होळी करताना आदित्य, उद्धव ठाकरे उपस्थित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












