अजय बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आतापर्यंतची सर्वात बोचरी टीका केली आहे. जरांगे यांचे आंदोलन खोटे असून ते केवळ ऑस्करच्या तोडीचा अभिनय करत असल्याचा घणाघात बारसकरांनी केला. एकेकाळी लोकांचे अलोट प्रेम मिळवणारे जरांगे आता आंदोलनात येण्यासाठी लोकांकडे भीक मागत आहेत, इथपर्यंत त्यांची अवस्था वाईट झाली असल्याचा दावा त्यांनी केला.
जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्यासाठी आपला मार्ग का बदलला, यावरही बारसकरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जुन्या मार्गावरील लोकांना जरांगेंचा भंपकपणा समजला असून आता तिथे गर्दी जमणार नाही, या भीतीनेच त्यांनी नवा रस्ता निवडल्याचे बारसकर म्हणाले. तीन वेळा मुंबईच्या दिशेने जाऊनही हाती काहीच लागले नसताना, आता पुन्हा कशासाठी चाललोय हेच जरांगेंना सांगता येत नसल्याची टीका त्यांनी केली.
Ajay Baraskar criticizing Manoj Jarange Patil
मनोज जरांगेंच्या आर्थिक उलाढालींवर गंभीर आरोप
याव्यतिरिक्त, जरांगे यांच्याकडे अचानक आलेल्या पैशांवरूनही बारसकरांनी संशय व्यक्त केला. त्यांच्या दिमतीला असलेल्या महागड्या गाड्या आणि लीलावती रुग्णालयातील उपचारांचा खर्च कुठून आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्ताधारी आणि महाविकास आघाडीतील नेतेच जरांगेंना आलटून-पालटून रसद पुरवत असल्याचा खळबळजनक आरोप करत, राजकीय फायद्यासाठी त्यांच्याकडून विरोधकांना शिव्या देण्याची ‘सुपारी’ दिली जात असल्याचे बारसकर म्हणाले.
मराठा समाजाला सध्या ओबीसी किंवा एसईबीसीअंतर्गत आरक्षणाचे दाखले मिळत असताना, जरांगे नेमकी कसली मागणी करत आहेत, असा मुद्दा त्यांनी मांडला. जरांगे यांची सध्याची मागणी खुद्द ब्रह्मदेव खाली आला तरी पूर्ण होऊ शकत नाही, असे सांगत, जर अपेक्षित गर्दी जमली नाही तर ते मुंबईला जाण्याऐवजी पुन्हा रुग्णालयात दाखल होतील, असा दावाही अजय बारसकरांनी केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही अडवायचं नाही, जिथं अडवाल तिथं…: मनोज जरांगे
- मनोज जरांगे यांचा मुंबईकडे कूच करण्याचा फायनल प्लॅन ठरला; सरकारला दिला थेट आणि निर्वाणीचा इशारा
- मनोज जरांगे मुंबईत धडकणार! हायकोर्टाचा मोठा निर्णय, आंदोलनाला रोखण्यास स्पष्ट नकार












