रायगड: जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर खालापूरमधील कंपन्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी रोजगाराच्या मुद्द्यावरून नुकतेच आंदोलन केले होते. या आंदोलनावर थोरवे यांनी सडकून टीका केली. हे आंदोलन म्हणजे स्थानिकांच्या हितासाठी नसून स्वतःची झोळी भरण्यासाठी केलेली स्टंटबाजी आहे, असा घणाघात त्यांनी केला. खालापूरमधील कंपन्या स्थानिकांना रोजगार देत असताना राष्ट्रवादीकडून त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप थोरवे यांनी केला. तसेच, कुणी कंपन्या बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा थेट इशारा थोरवे यांनी तटकरे आणि घारे यांना दिला आहे.
Shiv Sena MLA Mahendra Thorve vs NCP MP Sunil Tatkare
रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील हा कलगीतुरा नवा नाही. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली होती. विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने माघार घेतली नसती, तर त्यांचा राजकीय जन्मच झाला नसता, असे म्हणत दळवी यांनी अनिकेत तटकरे यांचा ‘सरोगसी बाळ’ असा उल्लेख केला होता.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने सुरुवातीला आपला उमेदवार देण्याची तयारी केली होती. मात्र, एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यातील चर्चेनंतर शिवसेनेने माघार घेतली. ठाकरे गटाच्या बाळ माने यांनीही अर्ज मागे घेतल्याने अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला होता.
यापूर्वी रायगडच्या पालकमंत्रीपदावरून मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे यांच्यातही मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली होती. अखेर विधानपरिषदेच्या सामंजस्यानंतर गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळाले. मात्र, जिल्ह्यातील दोन्ही पक्षांमधील वर्चस्वाची लढाई अजूनही थांबलेली नाही, हेच थोरवे यांच्या ताज्या आरोपांवरून स्पष्ट होत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही अडवायचं नाही, जिथं अडवाल तिथं…: मनोज जरांगे
- मनोज जरांगे यांचा मुंबईकडे कूच करण्याचा फायनल प्लॅन ठरला; सरकारला दिला थेट आणि निर्वाणीचा इशारा
- मनोज जरांगे मुंबईत धडकणार! हायकोर्टाचा मोठा निर्णय, आंदोलनाला रोखण्यास स्पष्ट नकार











