Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे, २९ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, या काळात विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे. (Heavy Rain Warning Vidarbha, Marathwada, Konkan)
पुढील ३ दिवस अत्यंत महत्त्वाचे
याउलट, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता, सखल भागात पाणी साचणे, नद्या व ओढ्यांना पूर येणे, किरकोळ स्वरूपाचे नुकसान, वाहतुकीत अडथळे आणि दैनंदिन जनजीवनावर स्थानिक पातळीवर परिणाम होणे यांसारखे धोके नाकारता येणार नाहीत.
मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये दरडी कोसळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हवामानाच्या सध्याच्या अंदाजानुसार, कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव २९ जुलै रोजी प्रामुख्याने विदर्भात विशेषतः पूर्व विदर्भात जाणवण्याची शक्यता आहे. ३० जुलै रोजी हा प्रभाव पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्र आणि कोकण या भागांत अधिक तीव्र होऊ शकतो.
राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा
३१ जुलै रोजी खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. ३० जुलै ते ३१ जुलै या काळात मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. विशेषतः ३० जुलै रोजी रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.
विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमधील रहिवाशांना या काळात सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विशेषतः सखल भाग, नद्या व ओढ्यांचा परिसर आणि घाट मार्गांवरून प्रवास करताना अतिरिक्त खबरदारी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- आसाममध्ये हाहाकार! ७६३ गावं पाण्याखाली, पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आला सलमान खान, नेमकं काय करतोय?
- PMC भ्रष्टाचाराचा स्फोट! ‘देवाभाऊंचा निरोप’ कोडवर्ड म्हणत काँग्रेस नेत्याचं मोहन भागवतांना थेट पत्र
- “बॉलिवूडमध्ये कुठे-कुठे तोंड काळं केलंय….”; कंगना रणौतची राखी सावंतने थेट लायकी काढली! नेमकं काय घडलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












