🕒 1 min read
मुंबई : मिसिंग लिंक प्रकल्पावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत “मिसिंग लिंकवरून (Missing Link) राजकारण करू नका, महाराष्ट्राचा अपमान करू नका” असे विधान केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. मुंबईत मनसे रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना त्यांनी सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली.
प्रश्न विचारला म्हणजे महाराष्ट्राचा अपमान कसा?
राज ठाकरे म्हणाले की, एखाद्या प्रकल्पातील त्रुटींवर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान कसा होतो? लोक मिसिंग लिंकबाबत प्रश्न विचारत आहेत, त्यात राज्याचा अपमान कुठे आहे? सरकारच्या कामावर प्रश्न उपस्थित करण्याचा नागरिकांना पूर्ण अधिकार आहे. विरोधी पक्षात असताना सध्याचे सत्ताधारीही सरकारविरोधात आंदोलन करत होते. मग त्यावेळी ते राजकारण नव्हते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी सरकारवर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप केला. विरोधात असताना सत्ताधाऱ्यांनी अनेक आंदोलनं केली, सरकारवर टीका केली आणि विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले. मात्र, आता स्वतः सत्तेत आल्यानंतर त्याच प्रकारच्या प्रश्नांना राजकारणाचे स्वरूप दिले आहे, अशी टीका त्यांनी केली.
फडणवीसांच्या विधानावर आक्षेप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मिसिंग लिंक प्रकल्पाच्या गुणवत्तेचे समर्थन करत “राजकारण करणाऱ्यांना बघून घेऊ” असा इशारा दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणून अशी भाषा शोभत नाही. सरकारवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना धमकावण्याऐवजी त्यांच्या शंकांचे निरसन करणे ही सरकारची जबाबदारी आहे.”
विधानसभेत हिंदीत का बोललात?
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील हिंदी वापरावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विधानसभा महाराष्ट्राची, समोरचे आमदार मराठी आणि तरीही मुख्यमंत्री अचानक हिंदीत का बोलले? ते कोणासाठी बोलत होते? असा प्रश्न त्यांनी विचारला. भाजपमध्ये अंतर्गत मतभेद सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर हे वक्तव्य झाले असावे, असा दावाही त्यांनी केला.
विकासाच्या नावाखाली महाराष्ट्राचा विचका
राज ठाकरे यांनी राज्यातील पायाभूत सुविधांवरही टीका केली. त्यांच्या मते, विकासाच्या नावाखाली शहरांचे नियोजन बिघडवले जात आहे. केवळ रस्ते, उड्डाणपूल आणि इमारती उभारणे म्हणजे विकास नाही. मिसिंग लिंकचे उद्घाटन होऊन अवघे दोन महिने झाले असताना बोगद्यातून पाणी गळत आहे. असा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
काही कंत्राटदारांना कंत्राटातील मोठा हिस्सा विविध स्तरांवर द्यावा लागतो, त्यामुळे प्रत्यक्ष कामासाठी कमी निधी उरतो आणि त्याचा परिणाम कामाच्या गुणवत्तेवर होतो, असा दावा त्यांनी केला. त्यामुळेच राज्यात निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.
📌 महत्वाच्या बातम्या
- Dr Nitin Raut: महानिर्मितीच्या खाजगीकरणावर सरकारला घेरले; ‘1600 मेगावॅट बंद करण्यामागे कोणाचा फायदा?’
- Palkhi Sohala Pune: पालखी सोहळ्यासाठी 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त; AI तंत्रज्ञानातून होणार देखरेख
- Maharashtra Rain Alert: IMD चा पुढील 24 तासांसाठी मोठा इशारा; अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











