🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर/ठाणे : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच, आता अर्ज छाननीच्या प्रक्रियेवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मनसे नेते अविनाश जाधव ( Avinash Jadhav ) यांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत थेट अधिकाऱ्यांवरच तोफ डागली आहे. “सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर विरोधकांचे अर्ज बाद करण्याचे षडयंत्र रचले जात आहे,” असा खळबळजनक दावा अविनाश जाधव यांनी केला.
जाधव यांच्या म्हणण्यानुसार, अर्ज छाननीच्या वेळी नियमांची पायमल्ली झाली. एकीकडे सत्ताधारी शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांचे अर्ज रकाने रिकामे असूनही मंजूर केले जात आहेत, तर दुसरीकडे क्षुल्लक तांत्रिक कारणे देत विरोधकांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. एका प्रसंगाचा दाखला देताना ते म्हणाले, “आमच्या उमेदवार सकाळी ११ च्या आधीच कार्यालयात हजर होत्या. पण साहेब लोकांचं ‘चहा-पाणी’ सुरू होतं म्हणून त्या बाहेर थांबल्या. जेव्हा त्या आत गेल्या, तेव्हा ‘तुम्ही उशिरा आलात’ असं सांगून त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला.” अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारावर जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
“ही लोकशाही आहे की राजेशाही? अधिकारी जर ‘मॅनेज’ होऊन काम करणार असतील, तर आम्ही निवडणूक लढवायची तरी कशाला? हा सरळसरळ जनतेवर अन्याय आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि राजन विचारे यांनीही याच मुद्द्यावर आक्षेप घेतल्याची आठवण करून दिली.
प्रकरणाचे गांभीर्य वाढवत जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांना खुला इशारा दिला आहे. “तुम्ही स्वतःला देवाच्या भूमिकेत समजू नका. वृषाली पाटील यांनी ज्या पद्धतीने वागणूक दिली आहे, ते पाहता आता आम्ही गप्प बसणार नाही. माहितीच्या अधिकारात (RTI) त्यांची सर्व माहिती काढू आणि त्यांच्या मालमत्तेची चौकशी लावू,” असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. या इशाऱ्यामुळे निवडणूक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- तिकीटासाठी निष्ठेचा लिलाव; ठाण्यात ८ दिवसांत ३ पक्ष बदलणाऱ्या गुन्हेगाराला उमेदवारी, निष्ठावंतांना अश्रू अनावर
- PSI भरती वयोमर्यादेचा तिढा कायम; मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्याने विद्यार्थी आक्रमक, परीक्षेवर अनिश्चिततेचे सावट
- मुंबईत राडा, तरीही नेत्यांना दिसेना बंडखोरी; अमित साटम म्हणतात, ‘सगळं कसं आलबेल’!













