🕒 1 min read
ठाणे/छत्रपती संभाजीनगर: राज्यातील महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत राजकीय निष्ठा खुंटीला टांगल्याचे चित्र आहे. तिकीटासाठी नेत्यांच्या दारात उभे राहणारे कार्यकर्ते आता कोणत्याही थराला जाताना दिसत आहेत. ठाण्यात तर पक्षांतराचा एक नवा विक्रमच प्रस्थापित झाला आहे. मयूर शिंदे या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराने उमेदवारी मिळवण्यासाठी अवघ्या ८ दिवसांत ३ पक्ष बदलले आहेत. आधी शिंदे गट, मग भाजपा आणि अखेर अजित पवार गटाच्या ‘घड्याळा’चा गजर करत त्याने तिकीट पदरात पाडून घेतले.
३० डिसेंबरला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हे महाशय अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून समोर आले. विशेष म्हणजे, २२ डिसेंबरपर्यंत ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत होते. २३ डिसेंबरला त्यांनी भाजपात प्रवेश केला, पण तिथे डाळ शिजत नाही हे पाहताच त्यांनी थेट राष्ट्रवादीत उडी घेतली. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि ‘मोक्का’ (MCOCA) सारखे गंभीर गुन्हे अंगावर असतानाही पक्षांनी त्यांना पायघड्या का घातल्या? हा प्रश्न आता ठाण्यातील निष्ठावंत विचारत आहेत. संजय राऊतांना धमकी दिल्याने चर्चेत आलेल्या मयूर शिंदेंना तिकीट मिळाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे.
तिकीट वाटपाचा हा ‘तमाशा’ केवळ ठाण्यापुरता मर्यादित नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाच्या कार्यालयात अक्षरशः राडा झाला. १८ वर्षे पक्षासाठी काम केलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना डावलल्याने त्यांनी कार्यालयातच टाहो फोडला. मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांना संतापलेल्या महिला कार्यकर्त्यांच्या शिवीगाळीला सामोरे जावे लागले. तिकडे ठाण्यात १८ वर्षे नगरसेवक राहिलेले मधुकर पावशे यांचे तिकीट कापल्याने त्यांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष अर्ज भरला आहे.
राज्यात १५ जानेवारीला मतदान होणार असून, १६ जानेवारीला निकाल लागेल. मात्र, तिकीट वाटपातील हा गोंधळ आणि गुन्हेगारांना दिलेली संधी मतदारांच्या पचनी पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- PSI भरती वयोमर्यादेचा तिढा कायम; मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्याने विद्यार्थी आक्रमक, परीक्षेवर अनिश्चिततेचे सावट
- मुंबईत राडा, तरीही नेत्यांना दिसेना बंडखोरी; अमित साटम म्हणतात, ‘सगळं कसं आलबेल’!
- तिकिटासाठी मारामारी, पण निकालाआधीच भाजपाचा ‘षटकार’; ६ शिलेदार बिनविरोध विजयी!
- “आम्ही फक्त सतरंज्याच उचलायच्या का?” नाशिकमध्ये भाजप कार्यकर्ते भडकले, सुनील केदारांनी काढला पळ!













