🕒 1 min read
जालना | प्रतिनिधी
जालना जिल्ह्यात अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी मंजूर करण्यात आलेल्या शेतकरी पीक अनुदानातून ( Farmer Fund Scam ) तब्बल ५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही रक्कम तहसीलदारांच्या लॉगिनचा वापर करून तलाठी, ग्रामसेवक आणि मंडळ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावे बनावट यादी तयार करून उचलल्याचा आरोप आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीनं प्राथमिक तपासात डुप्लिकेट लाभार्थी, बोगस याद्या, आणि कागदपत्रांत छेडछाड यांसारख्या गंभीर अनियमितता उघड केल्या आहेत. नोव्हेंबर–डिसेंबर २०२३ दरम्यान काही शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या, त्यावरून त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती.
50 Crore Farmer Fund Scam in Jalna
अंबड व घनसांगवी तालुक्यातील सुमारे ७५ ते ८० गावांमधील प्रकरणांवर सध्या चौकशी सुरू आहे. संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक यांना समितीने चौकशीसाठी बोलावून त्यांच्या याद्यांची फेरतपासणी केली जात आहे. तरीही, अंतिम यादी व चौकशी अहवाल अद्याप पूर्ण झालेला नाही.
त्रिसदस्यीय चौकशी समितीमध्ये कोण?
पुलकित सिंह – सहाय्यक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी, अंबड
मनीषा दांडगे – उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना
नीलम लुणावत – नायब तहसीलदार, रोजगार हमी योजना, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना
जालना जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले होते. यावरून शासनाकडून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. मात्र त्याचाच गैरफायदा घेत काही कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे हडप केल्याचा आरोप आहे.
प्रशासनाकडून अद्याप अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नसला तरी, प्राथमिक अंदाजानुसार ५० कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश होण्याची शक्यता असल्यामुळे ही चौकशी राज्यपातळीवरही महत्त्वाची ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- संभाजी भिडेंना कुत्र्याने नव्हे, कुत्रीने चावलं! चार पिल्लांच्या आईने घेतला चावा
- ‘कुत्री एकनिष्ठ असतात’ म्हणणाऱ्या Sambhaji Bhide यांना कुत्र्याचा चावा!
- “ठाकरे गटाला सत्तेत यायचंय, पण घेत नाहीत”; Chandrakant Patil यांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












