पुणे, 11 ऑक्टोबर: पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) हे प्रशासकीय सुधारणा समितीचे सचिव म्हणून काम पाहतील, अशी मोठी घोषणा शिवेंद्रराजे यांनी केली आहे.
शासनाची भूमिका पूर्णपणे सकारात्मक असल्याचे सांगताना शिवेंद्रराजे म्हणाले की, गेल्या १५ दिवसांत केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १६०० जागा भरण्याची मागणी एमपीएससीकडे पाठवण्यात आली आहे. इतर विभागांतही वेगाने काम सुरू असून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासन सातत्याने पाठपुरावा करत आहे. तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि प्रशासकीय सुधारणा अधिक सक्षमपणे राबवल्या जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी संवाद साधताना त्यांनी राजकारण टाळण्याचे आवाहन केले. “देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या वतीने मध्यस्थी करण्यासाठी मला येथे पाठवले आहे. तरी आपण सर्व याच मातीतील आहोत. त्यामुळे या विषयावर राजकारण न करता विद्यार्थ्यांचे हित पाहणे हीच आमची प्राथमिकता आहे,” असे ते म्हणाले. सध्या आचारसंहिता लागू असल्याने शासनावर काही मर्यादा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार, विश्वजित कदम आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी तयार केलेला मागण्यांचा अंतिम मसुदा शासनाकडे पोहोचल्याची माहिती शिवेंद्रराजे यांनी दिली. काही गोष्टी कायदेशीर आणि तांत्रिक बाबींवर अवलंबून असतात, मात्र आपण कायद्याच्या चौकटीत राहूनच मार्ग काढला पाहिजे, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांचा अंतिम हेतू १०० टक्के साध्य होईल हा माझा शब्द आहे, अशी हमी देत त्यांनी आंदोलकांना आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- इंदूरमध्ये टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर विजय; २२३ धावा करून कशी फिरवली मॅच?
- गेल्या ७२ तासांत ‘हुकूमशाह’ मोदींनी आणीबाणीलाही मागे टाकले; सीजेपीचा दिल्लीत हल्लाबोल
- तामिळनाडूच्या विकासासाठी मुख्यमंत्री विजय यांच्यासोबत काम करणार; पंतप्रधान मोदींची चेन्नईत ग्वाही
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









