पुणे, 12 ऑक्टोबर: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा दिला आहे. मंत्री समितीने निश्चित केलेल्या विविध कपातींच्या रकमा भरल्या नसल्याच्या कारणास्तव कारखान्यांना ऊस गाळप परवाना देण्यास नकार देऊ नये, असा महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील साखर कारखान्यांचा २०२६-२७ या हंगामातील गाळप परवाने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, साखर आयुक्तालयाने १४ खाजगी कारखान्यांना ऑनलाईन परवाने (Sugarcane Crushing License) वितरित केले आहेत.
यंदाच्या गाळप हंगामासाठी परवाना मिळवण्यापूर्वी कारखान्यांनी काही विशिष्ट रकमा भरणे मंत्री समितीने बंधनकारक केले होते. यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन १० रुपये, लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळासाठी १० रुपये, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी १ रुपया, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ वर्गणीसाठी १ रुपया आणि साखर संकुल देखभाल व दुरुस्तीसाठी ५० पैसे प्रतिटन या कपातींचा समावेश होता.
या सक्तीच्या निर्णयाला छत्रपती संभाजीनगर येथील पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेडने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (रिट याचिका क्रमांक १३८९४ सन २०२६) आव्हान दिले होते. यावर न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी आणि आबासाहेब डी. शिंदे यांच्या खंडपीठाने शुक्रवारी (दि. ९) सुनावणी करत याचिकाकर्त्यांना अंतरिम दिलासा दिला. यासाठी मुख्य पीठाने तत्सम प्रकरणात (रिट याचिका १४८६२ सन २०२५) दिलेल्या आदेशांचा संदर्भ घेण्यात आला. प्रस्तुत याचिकेवर अंतिम निर्णय येईपर्यंत, केवळ कपातींच्या रकमा भरल्या नाहीत या कारणावरून महाराष्ट्र शासनाच्या साखर आयुक्तांनी याचिकाकर्त्याला ऊस गाळप परवाना नाकारू नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाच्या या आदेशानंतर साखर आयुक्तालयाकडून शनिवारी (दि. १०) सायंकाळी राज्यातील १४ खाजगी साखर कारखान्यांना यंदाच्या हंगामासाठी ऊस गाळप परवाने वितरित करण्यात आले. यामध्ये पंचगंगा शुगर अँड पॉवर, बारामती ॲग्रो लिमिटेड (प्लॅण्ट कोड १८३०१ आणि ६७३०१), बारामती ॲग्रो लिमिटेड-शेटफळगडे युनिट १ ता. इंदापूर (प्लॅण्ट कोड ६०७०१), श्री सुभाष शुगर, लोकमंगल ॲग्रो इंडस्ट्रिज, गंगामाई इंडस्ट्रिज अँड कन्स्ट्रक्शन, अथनी शुगर्स, लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को-जनरेशन इंडस्ट्रिज, जाकराया शुगर्स, प्रसाद शुगर अँड अलाईड ॲग्रो प्रॉडक्टस, सद्गुरू श्री श्री साखर कारखाना, लोकमंगल माऊली इंडस्ट्रिज आणि शिऊर साखर कारखाना यांचा समावेश आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- इंडिया ‘अ’ चा ऑस्ट्रेलियावर ४९ धावांनी दणदणीत विजय, मुंबईकर सुर्यांश शेडगेची दमदार खेळी
- सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी फेटाळली इंडिया आघाडीची भेटीची विनंती; विरोधकांचा सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार
- MPSC अध्यक्ष भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी सरकारने फेटाळली; शिवेंद्रराजे भोसलेंची माहिती
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









