हिंगणघाट : “राज्य सरकार झोपेचे सोंग घेत आहे. सरकारला या झोपेतून जागे करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. या लढ्यात आता सामान्य जनतेचा पाठिंबा मिळणे अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले.
सोमवारी हिंगणघाट येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘स्मार्ट मीटर’च्या (Smart Meter) विरोधात एका निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी केले. आंदोलनादरम्यान आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
Rohit Pawar on smart meter protest
यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमर काळे, माजी आमदार भुसारा, अनिल जवादे, प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे, विनोद वानखेडे, अमोल बोरकर, नगरसेविका शीतल बोरकर, लोणकर, महेश झोटिंग, शुभांगी डोंगरे, सुनील पिंपळकर आणि मोहम्मद रफीक आदी मान्यवर उपस्थित होते.
“राज्यात स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लुटमार सुरू आहे. हे स्मार्ट मीटर आधी शासकीय कार्यालयात लावू, ही चाचणी यशस्वी झाल्यावर ५ वर्षानंतर सर्वसामान्यांच्या घरी लावू, असे शासनाने जाहीर केले होते. मात्र, आता बळजबरीने हे मीटर सर्वसामान्यांच्या घरी लावण्याची मोहीम सुरू आहे.” असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
स्मार्ट मीटर्स बसवण्यासाठी २७,००० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सत्तेत असलेल्यांनी भ्रष्टाचाराचा मार्ग म्हणून ही योजना आखल्याचा आरोप पवार यांनी केला. तसेच, त्यांनी शेतकऱ्यांना शेतमालाला हमीभाव न मिळणे आणि खतांच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ यांवरही टीका केली.
राज्य सरकारने कर्जमाफीची एक दिशाभूल करणारी योजना जाहीर केली होती, ज्याच्या विरोधात त्यांनी आंदोलन केले होते. आता या योजनेचा ५५ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असा दावा त्यांनी केला. याव्यतिरिक्त, ‘शक्तिपीठ’ महामार्ग प्रकल्पाद्वारे ४०,००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होईल, असा आरोपही त्यांनी केला.
आंदोलनादरम्यान, आंदोलकांच्या एका शिष्टमंडळाने विविध मागण्यांचा समावेश असलेले निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर केले. विशेष म्हणजे, रोहित पवार आणि शशिकांत शिंदे हे हिंगणघाट शहरात प्रवेश करत असताना, सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी कारंजा चौकात त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात येताच पोलिसांनी संबंधित नगरसेवकांना ताब्यात घेतले.
पहिला ऐतिहासिक मोर्चा
स्मार्ट मीटरविरोधात महाराष्ट्रातील हा पहिला ऐतिहासिक व प्रचंड मोर्चा आहे. असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले. भर पावसात शरद पवार यांनी सभेला संबोधित केले होते, तर आजही पावसाला न जुमानता हिंगणघाट येथे मोर्चा झाला. पाऊस पडतो तेव्हा क्रांती होते, येथेही क्रांती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुलतानपूर येथील पुलासाठी एक महिन्याची मुदत आपण प्रशासनाला देत असून त्यानंतर आपण स्वतः येथे येऊ व अधिकाऱ्याना धडा शिकवू असा निर्वाणीचा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- रुपाली चाकणकरांचा ओटीटीवर दबाव, मानसिक छळ; दिपाली सय्यद यांचा मोठा गौप्यस्फोट
- MPSC पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; फेरपरीक्षेची केली मागणी
- रक्षाबंधनाला भावासाठी राखी घेताय? बाजारातील ‘ही’ चूक टाळा, शास्त्र काय सांगतंय पाहा…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











