ठाणे, 18 नोव्हेंबर: ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरात मंगळवारी पहाटे दरोड्याची एक घटना घडली आणि वाऱ्यासारखी पसरलेली ही बातमी चर्चेचा विषय ठरली. ज्यांच्या घरी चोरी झाली त्यांचे नाव ‘तुकाराम मुंडे’ असल्याने, राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त आणि डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याच घरात चोरी झाल्याचा समज अनेकांचा झाला. यामुळे सोशल मीडियासह संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी माहिती दिल्यानंतर या अफवांना पूर्णविराम मिळाला असून, चोरी अधिकाऱ्याच्या नव्हे तर एका स्थानिक उद्योजकाच्या घरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिवा शहरातील आगासनगाव परिसरात स्थानिक उद्योजक तुकाराम सत्यवान मुंडे यांचा बंगला आहे. याच बंगल्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करून दरोडा टाकला. या घटनेत घरातील जवळपास अडीच तोळे सोन्याचे दागिने आणि ८० हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज लुटून नेण्यात आला. तक्रारदाराचे नाव वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या नावाशी मिळतेजुळते असल्याने सुरुवातीला नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शतपावलीसाठी घराबाहेर पडला, आरोपींनी डाव साधला; पंढरपुरात राजाभाऊ भिंगेची गोळ्या झाडून हत्या
- कार्तिकी वारीच्या तोंडावर पंढरपुरात गोळीबार; रेकॉर्डवरील गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
- ॲडलेड स्ट्रायकर्सला मोठा धक्का; सोफी एक्लेस्टोन दुखापतीमुळे WBBL 2026 मधून बाहेर







