पिंपरी चिंचवड, 12 ऑक्टोबर: भरधाव वेगातील टेम्पो हळू चालवण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये समोर आली आहे. तळेगाव-म्हाळुंगे परिसरातील वराळे गावात गुरुवारी (८ ऑक्टोबर) रात्री हा हिंसक प्रकार घडला. लाकडी दांडक्याने एकमेकांवर केलेल्या या हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन नऊ टाके पडले आहेत, तर दुसऱ्या गटातील एका व्यक्तीच्या हाताचे हाड मोडले आहे.
याप्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी (उत्तर म्हाळुंगे) पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या असून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, वराळे गावाच्या हद्दीत रात्रीच्या वेळी एक टेम्पो अतिशय वेगाने जात होता. अपघात होऊ नये म्हणून तो हळू चालवण्यास सांगण्यात आले. मात्र, या साध्या सल्ल्यावरूनच दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये वाद पेटला आणि अल्पावधीतच त्याचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. हाती लागतील त्या वस्तू आणि लाकडी दांडक्यांचा वापर करून दोन्ही गटांनी एकमेकांना मारहाण केली.
रणजित संतोष हिवाळे (वय ३०, रा. वराळे) यांनी दिलेल्या पहिल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी समाधान विलास गायकवाड (वय २८) आणि सचिन विलास गायकवाड (वय ३१) यांना अटक केली असून, विलास पांडुरंग गायकवाड यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. याच मारहाणीत एका तरुणाच्या डोक्याला ९ टाके पडले आहेत.
दुसऱ्या बाजूने विलास गायकवाड यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रणजित हिवाळे, अजय रोहिदास यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींनी गायकवाड कुटुंबीयांवर हल्ला केला. यावेळी रणजित हिवाळेने लाकडी दांडक्याने केलेल्या प्रहारामुळे विलास गायकवाड यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले आहे. सध्या म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरात शांतता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- तुळजापुरात भवानी ज्योत नेणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून मारहाण? शटर बंद करून बदडल्याचा आरोप
- बीडमध्ये भररस्त्यात तरुणाला दांडक्याने मारहाण; भांडण सोडवायला गेलेल्या महिलांनाही दिला धाक
- पुण्यात बोगस महाविद्यालयाचा पर्दाफाश; प्रवेश न घेण्याचे पुणे विद्यापीठाचे विद्यार्थ्यांना आवाहन
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









