🕒 1 min read
मुंबई, दि. ९ ऑगस्ट २०२४ | Chhatrapati Shivaji Maharaj | Maharashtra politics
भारतीय जनता पक्षाचा ४०० पारचा रथ महाराष्ट्रानेच रोखला. काँग्रेस पक्ष एससी, एसटी, मागास समाजाला प्राधान्य दिले जात आहे, लोकसभेच्या निवडणुकीत या समाजाचे प्रतिनिधीत्व वाढले आहे आणि विधानसभा निवडणुकीतही असाच विजय संपादन करावयाचा आहे. एससी एसटी प्रवर्गाच्या ५४ जागा आहेत या जागांतील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काम करावे लागेल. विधानसभेला एससी, एसटी प्रवर्गाच्या जास्तीत जास्त जागा लढवण्याच्या प्रयत्न काँग्रेस पक्ष करेल, असे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.
भारतीय जनता पक्षाचा ४०० पारचा रथ महाराष्ट्रानेच रोखला, महायुती सरकार सर्वात भ्रष्ट सरकार: रमेश चेन्नीथला.
रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, विविध राज्यात आरक्षणाची मागणी जोर धरत आहे, जास्तीत जास्त समाजाला आरक्षणाचा लाभ द्यायचा असेल तर जातनिहाय जनगणना करावी लागणार आहे तसेच ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी लागणार आहे म्हणूनच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्धार केला आहे.
नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा संसदेला नमन केले आणि संसद भवन बदलले यावेळी मोदींनी संविधानाला नमन केले आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपवायला निघाले आहेत. देशात सर्वात जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्रातील महायुती सरकारने केला आहे. विकास काम होत नाही फक्त लुट सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांवर ७० हजार कोटींचा आरोप केला, प्रफुल्ल पटेलांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांनाही भाजपात प्रवेश देऊन पवित्र केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र भाजपा युती सरकारने गुजरातला गहाण ठेवला – नाना पटोले
यावेळी नाना पटोले म्हणाले की, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जनगणनेची भूमिका मांडली, बहुजनांची आर्थिक, सामाजिक शैक्षणिक सर्वे केला तरच न्याय मिळेल पण भाजपा व मोदी सरकारचा मात्र जनगणनेला विरोध आहे. युपीए सरकारने आणलेल्या महिला आरक्षणाला भाजपाने विरोध केला होता आणि तेच विधेयक भाजपाने मंजूर केले पण त्याची अमंलबजावणी केली नाही.
महिला आरक्षणाची अंमलबजावणी न करून केंद्रातील भाजपा सरकारकडून लाडक्या बहिणींवर अन्याय केला आहे आणि राज्यात मात्र लाडकी बहिण असा दुजाभाव भाजपा करत आहे. विधानसभेला महायुती १०० जागाही जिंकू शकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र भाजपा युती सरकारने गुजरातला गहाण ठेवला आहे असा घणाघाती हल्लाबोल करत महाराष्ट्रातून भाजपा युती सरकार गेले की दिल्लीतील सरकारही कोलमडेल आणि जनगणना करण्याचा मार्ग मोकळा होईल असेही नाना पटोले म्हणाले.
भाजपाने लोकसभा निवडणुकीला ४०० जागा जिंकून संविधान बदलण्याचा नेरेटिव्ह पसरवला
यावेळी राजेश लिलोठीया म्हणाले की,भाजपाने लोकसभा निवडणुकीला ४०० जागा जिंकून संविधान बदलण्याचा नेरेटिव्ह पसरवला होता परंतु राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविधान रक्षणाचा संकल्प हाती घेतला व भाजपाचा हा डाव जनतेने हाणून पाडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान रक्षणाचे काम काँग्रेस व इंडिया आघाडीने केले. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत ९९ जागी विजय मिळला त्यात ३७ जागा एससी, एसटी समाजाच्या आहेत. विधानसभेला एससी विभागातील पदाधिकाऱ्यांचा विचार करावा, महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी काम करा असे आवाहनही लिलोठीया म्हणाले.
संविधान बदलण्याची भाषा ज्यांनी केली त्या भाजपाला धडा शिकवला- वर्षा गायकवाड
खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याची भाषा ज्यांनी केली त्या भाजपाला धडा शिकवला व मोदी सरकारचे एनडीए सरकार झाले. सामाजिक न्याय विभाग काही काम करत आहे का असा प्रश्न पडतो. महायुती सरकार फक्त कंत्राटदारांचे खिशे भरत आहे व स्वतः मलई खात आहे. भाजपा सरकारने संविधानाची प्रस्तावना अभ्यासक्रमातून काढण्याचे काम केले आहे.
महाराष्ट्रासह चार विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर केंद्रातील एनडीए सरकारलाही हादरा बसेल. लोकसभेत सक्षम विरोधी पक्ष असल्याने १० वर्षानंतर सरकारचे विधेयक संमत होऊ शकले नाही. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सरकारला संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावे लागले. आता विधानसभा निवडणुकीत विजय मिळवा आणि महाविकास आघाडीचे सरकार आणा, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
यावेळी सिद्धार्थ हत्तीअंबीरे म्हणाले की, १० वर्षापासून भाजपा सरकारमुळे मागास समाज अनेक योजनांपासून वंचित आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील दलित, मागास समाज काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला तसाच विधानसभेतही काँग्रेस पक्षाच्या मविआच्या पाठीशी उभे राहिल व भाजपा महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी काम करेल. मागास समाजातील लोकांना निवडणुकीत संधी द्यावी अशी मागणी हत्तीअंबिरे यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- बीड । राज ठाकरे यांची गाडी अडवून, सुपाऱ्या फेकल्या; मनसे कार्यकर्ते आणि मराठा आंदोलकात मोठा गोंधळ
- शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत मात्र जाहिराती आणि प्रचारासाठी पैसा?
- ज्याची ‘सत्ता’ अजित पवार त्यांचे; आघाडीची सत्ता आली तर ‘दादा’ तिकडे जातील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












