🕒 1 min read
विशेष प्रतिनिधी | मुंबई
इतिहासातली गद्दारी आजही मराठी माणसाचं रक्त खवळवते, पण वर्तमानातल्या राजकीय गद्दारीचं काय? मुंबई महानगरपालिकेच्या रणांगणात आता तोफा धडाडू लागल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी आज आपल्या शिवसैनिकांशी संवाद साधताना थेट एकनाथ शिंदेंवर असा काही शाब्दिक प्रहार केला की, ज्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
उद्धव ठाकरेंनी आज कोणतीही आडकाठी न ठेवता थेट मुघलांच्या आक्रमणाचे दाखले दिले. ते म्हणाले, ही लढाई साधीसुधी नाही, तर जशी मुघलांबरोबर झाली तशीच ही मुंबई महानगरपालिकेची लढाई आहे. एकनाथ शिंदेंचा उल्लेख करताना उद्धव ठाकरेंनी इतिहासातील गद्दार ‘सूर्याजी पिसाळ’ची आठवण करून दिली. “सूर्याजी पिसाळ जसा ४०० वर्ष लक्षात राहिला, तसा हा ‘मिंधे’ गट लक्षात राहील,” असा जहरी टोला त्यांनी लगावला. कपाळावर लागलेला गद्दारीचा टिळा ४०० वर्ष पुसला जात नाही, मग या गद्दारांचं काय होणार? असा सवाल उपस्थित करत त्यांनी शिंदेंना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.
Uddhav Thackeray compares Eknath Shinde to traitor Suryaji Pisal
पण उद्धव ठाकरेंचा हा हल्ला फक्त शिंदेंपुरता मर्यादित नव्हता. त्यांनी आपली तोफ थेट दिल्लीच्या दिशेनेही वळवली. “दोन गुजरात्यांच्या हातात आपल्याला मुंबई द्यायची नाही,” असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरही सडकून टीका केली. समोरून पैशांचा पाऊस पडेल, धनाचा वर्षाव होईल, पण एकही जागा या ‘नतद्रष्टांच्या’ हाती जाऊ देऊ नका, असा आदेशच त्यांनी शिवसैनिकांना दिला.
एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या चर्चांनी जोर धरलाय, तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गट ताकदीने मैदानात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून आता समोरासमोरची लढाई सुरू झाली आहे. “लढायचं, जिंकायचं आणि जल्लोष करायचा,” हा नारा देत ठाकरेंनी रणशिंग फुंकलंय. आता यावर शिंदे गट काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- “हा तर फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी!” लक्ष्मण हाकेंनी फोडला बॉम्ब; ‘या’ ४ बड्या नेत्यांची नावं घेत थेट चॅलेंज!
- जेम्स कॅमेरॉन यांची मोठी घोषणा: ‘टर्मिनेटर’ परत येणार, पण अर्नोल्ड आणि सारा कॉनर नसणार!
- पुढचा जेम्स बाँड कोण? कॅलम टर्नरचं नाव आघाडीवर; ॲरॉन टेलर-जॉन्सन शर्यतीतून बाहेर?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










