मुंबई, २३ सप्टेंबर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पक्ष फोडणाऱ्या आणि चोरणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमार असून त्यांना तातडीने तुरुंगात टाकले पाहिजे, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. तसेच ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रिया रद्द करून निवडणुका पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
सध्याच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांत झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जवळपास ४५ लाख मतदार यादीत घुसडण्यात आले. यातील ४० लाख मतदारांवर निवडणूक आयोगाने स्वतः ‘एसआयआर’च्या माध्यमातून आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे या निवडणुका रद्द करून तिन्ही राज्यांत पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या प्रक्रियेत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भूमिकेवरही त्यांनी संशय व्यक्त केला. निवडणूक आयोग गृहखात्याच्या सूचना मानत असेल, तर गृहमंत्रीच या सगळ्याचे सूत्रधार आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसे असेल तर त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
ज्ञानेश कुमार यांनीच पहिल्यांदा शिवसेनेवर आघात केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. सुरुवातीला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आले आणि नंतर एकतर्फी निर्णय देत ते इतरांना (शिंदे गटाला) दिले. शरद पवार यांच्या पक्षाच्या बाबतीतही हाच प्रयोग झाला असून आता तृणमूल काँग्रेसच्या बाबतीतही तेच केले जात असल्याचा दावा ठाकरे यांनी केला.
निवडणूक आयोग एका टोळीप्रमाणे काम करत असून, सत्तेच्या हव्यासापोटी लोकशाहीचा खून होत असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. मर्जीने निवडलेले आयुक्त निवडणाऱ्यांच्या घरचे पाणी भरणारच, असा टोला लगावत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून (Suo Moto) दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन याविरोधात लढावे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- दोन दिवसांत राज्यात दुष्काळ जाहीर करणार; लातूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
- कोणी ऐऱ्यागैऱ्याने श्रेय घेऊ नये, ठाण्याला आव्हान देऊ नये; मंत्री भरत गोगावलेंचा जरांगे पाटलांवर पलटवार
- TRAI चा मोबाईल ग्राहकांना दिलासा; इंटरनेट डेटाविना स्वस्त रिचार्ज प्लॅन देणे कंपन्यांना बंधनकारक












