🕒 1 min read
पैठण : आषाढी वारीचे वेध लागलेल्या लाखो वारकऱ्यांसाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा ठरला आहे. पैठण (Paithan) येथील श्री संत एकनाथ महाराज संस्थानातून संत एकनाथ महाराजांच्या ४२७ व्या पालखी सोहळ्याचे (Sant Eknath Maharaj Palkhi Sohala) पंढरपूरकडे (Pandharpur) भक्तिभावाने प्रस्थान झाले. यंदा अधिकमासामुळे पालखीचे प्रस्थान नेहमीपेक्षा काहीसे उशिरा होत असले तरी भाविकांचा उत्साह कायम आहे. पहाटे काकड आरती, महापूजा, पादुकांची पूजा आणि पारंपरिक धार्मिक विधी पार पडल्यानंतर चांदीच्या रथातून संतांच्या पादुकांचे विधिवत प्रस्थान करण्यात आले.
हरिनामाच्या गजरात निघाली पालखी
टाळ, मृदंग, वीणा आणि अखंड हरिनामाच्या गजरात हजारो वारकरी, दिंड्या आणि भाविक पालखीसोबत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. राज्याच्या विविध भागांतून भाविक पैठणमध्ये दाखल झाल्याने संपूर्ण नाथनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. पालखी मार्गावर सर्वत्र विठ्ठलनामाचा जयघोष आणि भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळत आहे.
४२७ वर्षांची अखंड परंपरा
संत एकनाथ महाराजांनी भागवत धर्म, समता, मानवता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. त्यांच्या समाधीनंतर सुपुत्र हरिपंडित महाराज यांनी पादुका पंढरपूरला नेण्याची परंपरा सुरू केली, जी पुढे पालखी सोहळ्यात रूपांतरित झाली. वारकरी संप्रदायात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांप्रमाणेच संत एकनाथ महाराजांच्या पालखीला विशेष मानाचे स्थान आहे.
२८५ किलोमीटरचा पालखी प्रवास
यंदाचा पालखी सोहळा सुमारे २८५ किलोमीटरचा प्रवास करणार असून, २४ जुलै रोजी पंढरपूर येथे आगमन होणार आहे. या प्रवासात पालखी छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांतील विविध गावांमध्ये मुक्काम करणार आहे. एकूण १७ मुक्काम आणि ५ पारंपरिक रिंगण सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
वारकऱ्यांसाठी प्रशासनाची विशेष तयारी
पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. प्रत्येक गावात पालखीचे स्वागत फुलांची उधळण, रांगोळ्या आणि हरिनामाच्या गजरात केले जाणार आहे.
पालखी प्रमुखांची रस्त्यांबाबत मागणी
पालखी प्रमुख रघुनाथ बुवा गोसावी यांनी पैठण ते पंढरपूर पालखी मार्गावरील अनेक रस्त्यांची दुरवस्था असल्याचे सांगत राज्य सरकारकडे दुरुस्तीची मागणी केली आहे. विशेषतः ग्रामीण भागातून जाणाऱ्या पालखी मार्गावर अनेक वर्षांपासून रस्त्यांची कामे प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
४२ दिंड्या आणि हजारो वारकरी
यंदा संत एकनाथ महाराजांच्या पालखीसोबत ४२ दिंड्या सहभागी झाल्या असून, सुमारे २५ ते ३० हजार वारकरी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. गेल्या वर्षी भाविकांच्या देणगीतून १५० किलो वजनाचा चांदीचा रथ तयार करण्यात आला असून, त्यातूनच संतांच्या पादुकांची मिरवणूक काढली जात आहे.
पालखी मुक्काम
७ जुलै – चनकवाडी (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर)
८ जुलै – हादगाव (ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर)
९ जुलै – कुंडल पारगाव (जि. बीड)
१० जुलै – मुंगसवाडे (ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर)
११ जुलै – राक्षसभुवन (ता. शिरूर कासार, जि. बीड)
१२ जुलै – रायमोह (जि. बीड)
१३ जुलै – पाटोदा (जि. बीड)
१४ जुलै – दिघोळ (जि. अहिल्यानगर)
१५ जुलै – खर्डा (जि. अहिल्यानगर)
१६ जुलै – दांडेगाव (ता. भूम, जि. धाराशिव)
१७ जुलै – अनाळे (ता. परंडा, जि. धाराशिव)
१८ जुलै – परंडा (जि. धाराशिव)
१९ जुलै – बिटरगाव (ता. माढा, जि. सोलापूर)
२० जुलै – कुर्डू (ता. माढा, जि. सोलापूर)
२१ जुलै – अरण (ता. पंढरपूर, जि. सोलापूर)
२२ जुलै – करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर)
२३ जुलै – होळे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर)
२४ जुलै – पंढरपूर (आगमन)
रिंगण सोहळे
१० जुलै – मिडसांगवी
१४ जुलै – पारगाव घुमरे
१७ जुलै – नांगरडोह
२० जुलै – कव्हेदंड
२४ जुलै – पंढरपूर (उभे रिंगण व पादुका आरती)
📌 महत्वाच्या बातम्या
- Farmer Loan Waiver : ‘या’ बँकांचे पीक कर्ज होणार माफ; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ
- Ketan Agrawal Case : लोहगड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सिया-चेतनच्या गुप्त लग्नाचा दावा
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची मोठी झेप, ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












