पुणे, 14 ऑक्टोबर: पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला दांडी मारणे भाजपच्या नगरसेवकांना चांगलेच भोवले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाकडे पाठ फिरवणाऱ्या १०० नगरसेवकांना पक्षाने थेट कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
पक्ष शिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत 'तुमच्यावर कारवाई का करू नये?', अशी विचारणा या नोटीसमध्ये करण्यात आली आहे. संबंधित नगरसेवकांना येत्या पाच दिवसांत यावर लेखी खुलासा द्यावा लागणार आहे. या खुलाशाचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवला जाईल व त्यानंतर कारवाईबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
गेल्या शनिवारी शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे आणि पक्षाचे आमदार प्रामुख्याने उपस्थित होते. पक्षाची कोणतीही बैठक, आंदोलन किंवा कार्यक्रम असल्यास नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक असते. त्यानुसार सर्वांना निरोपही देण्यात आला होता.
मात्र, १०० हून अधिक नगरसेवकांनी या कार्यक्रमाला दांडी मारली, तर काही जण केवळ हजेरी लावून निघून गेले. हा प्रकार लक्षात येताच सभागृहनेते गणेश बिडकर यांनी उपस्थित नगरसेवकांची नावे नोंदवण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी स्वतः सभागृहात फिरून कोण उपस्थित आहे, याची खातरजमा केली.
पुणे महानगरपालिकेत भाजपचे एकूण ११९ नगरसेवक निवडून आलेले आहेत, तर ७ जण स्वीकृत म्हणून जबाबदारी सांभाळतात. अशा एकूण १२६ नगरसेवकांपैकी तब्बल १०० जणांनी शिस्त मोडत कार्यक्रमाला गैरहजेरी लावल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुणे शिक्षक मतदारसंघ: महायुतीत होणार मैत्रीपूर्ण लढत, शिंदे गट सचिन सानपांच्या तर भाजप गावंडेंच्या पाठीशी
- दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची अग्रीम मदत; राज्यात आणखी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
- पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सचिन सानपांच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी
Quick Answers
पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यामुळे तसेच पक्ष शिस्तीचा भंग केल्यामुळे भाजपने १०० नगरसेवकांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे.
संबंधित नगरसेवकांना पाच दिवसांत लेखी खुलासा सादर करावा लागणार आहे.
सभागृहनेते गणेश बिडकर यांनी उपस्थित नगरसेवकांची नावे नोंदवण्याच्या सूचना दिल्या आणि स्वतः सभागृहात फिरून कोण उपस्थित आहे याची खातरजमा केली.
पुणे महानगरपालिकेत भाजपचे ११९ निवडून आलेले आणि ७ स्वीकृत असे मिळून एकूण १२६ नगरसेवक आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






