भंडारा, 17 ऑक्टोबर: नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना, भंडारा जिल्ह्यात महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शहरात झालेल्या दोन वेगवेगळ्या प्रचार मेळाव्यांकडे भाजप आमदार परिणय फुके आणि शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जाणीवपूर्वक पाठ फिरवली.
महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून भाजपकडून सुधाकर कोहळे ही निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी भंडाऱ्यात बावनकुळे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, यावेळी महायुतीचे दोन स्वतंत्र मेळावे पाहायला मिळाले. आमदार परिणय फुके यांनी 'शिवहरे कलार' सभागृहात तर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी 'संताजी' सभागृहात आपला स्वतंत्र मेळावा घेतला. विशेष म्हणजे, मंत्री शहरात उपस्थित असतानाही दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या कार्यक्रमाला जाणे टाळले.
शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना आमदार भोंडेकर यांनी बावनकुळे यांच्यासमोरच आपली उघड नाराजी आणि खदखद व्यक्त केली. यावर प्रतिक्रिया देताना महसूल मंत्र्यांनी सर्वांना कानपिचक्या दिल्या. महायुती आणि पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आपापसातील हेवेदावे व मतभेद विसरून एकत्र येण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच, या निवडणुकीत काँग्रेसला धडा शिकवत सुधाकर कोहळे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही बावनकुळे यांनी केले.
यावेळी आपल्या भाषणात भोंडेकर यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. एवढ्या मोठ्या मंत्र्यांच्या स्वागतासाठी साधी बैठक योग्य दिसली नसती, त्यामुळेच एका छोट्या बैठकीचे रुपांतर मोठ्या मेळाव्यात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, चुकीच्या व्यक्तींच्या मागे उभे न राहता चांगल्या विचारांच्या आणि महत्त्वाच्या नेत्यांना पाठबळ दिले पाहिजे, असे ते म्हणाले. राजकारणात जय-पराजय होतच असतो, मात्र वैयक्तिक पातळीवर किंवा कुटुंबाला धमक्या देणे अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी सुनावले.
एकमेकांविरोधात न राहता सर्वांनी मिळून काम केले तरच निवडणुका जिंकता येतील, अन्यथा कोणाचेच हित साधले जाणार नाही, असेही भोंडेकर म्हणाले. पक्ष वाढवण्याचा आणि राजकीय भाषेत प्रतिवाद करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण कोणी राजकीय लढाई सोडून वैयक्तिक पातळीवर येऊन धमक्या देत असेल तर आम्हीही गप्प बसणार नाही, असा स्पष्ट इशारा भोंडेकर यांनी यावेळी दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांच्या भेटीनंतर निलेश लंके आणि राम शिंदेंची गुप्त चर्चा; अहिल्यानगर जिल्हा बँकेत मोठा ट्विस्ट येणार?
- लोहगड केतन अग्रवाल हत्याप्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
- प्रदीप पूर्णेकरांनंतर पुढचं टार्गेट तू! पुतणी खुशबूला जीवे मारण्याची धमकी, प्रताप सरनाईक समोर असताना कुटुंबीयांचा दावा
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






