Share

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Atul Parchure Passed Away

Atul Parchure । मराठी रंगभूमी तसेच मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते म्हणजे अतुल परचुरे यांचे 57 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते. जवळपास वर्षभरापूर्वी अतुल परचुरे यांनी कॅन्सरवर यशस्वी मात केल्याची त्यांनी स्वत:च माहिती दिली होती.

अतुल परचुरे हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेते होते. मराठी सिनेमा, नाटक आणि मालिकांमधून ते घराघरात पोहोचले होते.

सिनेमा, नाटक आणि मालिकांमधून आपल्या विनोदानं प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचं काम त्यांनी केलं. तसंच, अनेक गंभीर भूमिकाही त्यांनी केल्या आहेत. अतुल परचुरे यांच्या निधनानं मराठी मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनीही अतुल परचुरे यांना श्रद्धांजली अर्पण करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Eknath Shinde यांची X वरील पोस्ट 

चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एग्झिट : रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली देदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला.

तरुण तुर्क म्हातारे अर्क, नातीगोतीसारखी नाटकं असोत किंवा पु. ल. देशपांडे यांचा शाब्दिक, वाचिक विनोद असो, अतुल परचुरे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी त्यात गहिरे रंग भरले.

मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या जाण्यामुळे मराठीतला एक अभिजात अभिनेता हरपला आहे. हे नुकसान भरुन येण्यासारखे नाही. परचुरे यांच्या हजारो चाहत्यांपैकी एक या नात्याने कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो. राज्य सरकारच्या वतीने मी त्यांना श्रध्दांजली वाहतो. ओम शांती.

Amol Kolhe यांची X वरील पोस्ट

अभिनय क्षेत्रातील माझे सहकारी व मित्र, आपल्या कसदार अभिनयाने मराठी रंगभूमीला समृद्ध करणारे, मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीत ही आपल्या कलेचा ठसा उमटवणारे चतुरस्त्र अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाची वार्ता अतिशय दुःखद आहे.

बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर नाटक, मालिका, सिनेमा अशा सर्वच व्यासपीठांवर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांचा हा प्रवास आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी असेल. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना व चाहत्यांना मिळो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली !

Atul Parchure Passed Away

महत्वाच्या बातम्या

Atul Parchure । मराठी रंगभूमी तसेच मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते म्हणजे अतुल परचुरे यांचे 57 व्या वर्षी निधन …

पुढे वाचा

Entertainment Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now