Amol Mitkari | सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ( Santosh Deshmukh Murder case ) उर्वरित आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी काल परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी भाषणं केली. भाजपा आमदार सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनीही या सभेत तुफान फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. धनंजय मुंडेंसह त्यांनी अजित पवार ( Ajit Pawar ) यांनाही टोला लगावला.
अजित पवारांचा उल्लेख करत त्यांनी धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्रीपद न देण्याची मागणी केली. या मागणीनंतर आता आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच बेभान सुटलेल्या बैलाला किती मोकाट सोडणार?, असा सवालही त्यांनी फडणवीसांना केला आहे.
“श्री. देवेंद्र फडणवीसजी आपल्या पक्षाचे आमदार श्री सुरेश धस यांनी काल परभणी मधील मुक मोर्चात क्या हुआ तेरा वादा अजितदादा अशा प्रकारे वक्तव्य करुन आदरणीय अजितदादाविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार?”, असं ट्विट करत अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर पलटवार केला आहे.
सुरेश धस यांचं वक्तव्य काय?
“संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का लागला पाहिजे. त्यांना मोका लागला म्हणजे, चार पाच वर्ष ते काही बाहेर येत नाही. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतले. “अजितदादा क्या हुँआ तेरा वादा…आकाच्या आकाला मंत्रिमंडळात का घेतले?”, असा सवाल करत सुरेश धस यांनी मुंडेंसह अजित पवारांनाही लक्ष्य केलं.
“बीड जिल्ह्यातील सर्व हत्या कोणी घडवून आणली? त्याचे रेकॉर्ड पाहा. संदीप दिगुळेपासून संतोष देशमुखापर्यंत हत्येची बेरीज केली तर त्याचा मास्टरमाईंड कोण, कोणी हे उद्योग केले हे तुम्हाला माहीत नसेल तर परभणीला माणसं पाठवा, बारामतीची माणसं पाठवा. इतर समाजाला काय वागणूक मिळते, अठरा पगड जातीला काय वागणूक मिळते?, आमच्या जिल्हा बिन मंत्र्यांच्या राहू द्या. त्यानंतर लोक आनंदी राहतील.”, असं सुरेश धस म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :