जालना, दि. 5 :- राज्यात अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत ( Agristack Scheme ) शेतकरी माहिती संच तयार करुन शेतकऱ्यांना त्यांचे ओळख क्रमांक देण्याबाबतचे कामकाज मोहिम स्वरुपात दि. 16 डिसेंबर, 2024 रोजीपासून राबविण्यात येत आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी करुन आपला ओळख क्रमांक प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा तालुकास्तरीय अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष डॉ.श्रीमंत हारकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
शासनाकडून अॅग्रीस्टॅक अॅप विकसित करण्यात आले असून त्या माध्यमातून शेतकरी स्वतः अथवा आपले सेवा केंद्र, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक व कृषि सहायक यांच्या माध्यमातून सदर योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ मिळणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी पात्र सर्व लाभार्थींना समाविष्ट करुन घेणे, शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी, किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करुन घेण्यात सुलभता, पिक विमा, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता, किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतक-यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पध्दतीने होवू शकेल.
शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज, वित्त, निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध करुन देण्यासाठी सुलभता येईल. शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषि व संलग्न विभागांना योजनांचा लाभ वितरीत करण्यामध्ये सुलभता येईल. शेतक-यांना वेळेवर कृषि विषयक सल्ले, विविध संस्थांकडून शेतकऱ्यांना संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नाविन्यपूर्ण कार्यक्रमांच्या विस्तार, प्रचारात सफलता प्राप्त होईल. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
महत्वाच्या बातम्या