प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: खासदार संजय राऊत यांनी एसआरए (SRA) घोटाळ्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांकडून मर्जीतील बिल्डरांना वाचवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत, आपण लवकरच असा ‘पुढचा बॉम्ब’ टाकू की त्यानंतर मुख्यमंत्र्यांना राजीनामाच द्यावा लागेल, असा खळबळजनक दावा राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला. हा विषय संपलेला नसून आपण शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबईतील ज्या पॉश भागात झोपडपट्ट्याच नाहीत, तिथे नियमबाह्य पद्धतीने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प दाखवण्यात आले आहेत. अशा जमिनी ताब्यात घेऊन राबवलेल्या एकूण ३०० प्रकल्पांमधून तब्बल ४० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. तरीही, या प्रकरणाची चौकशी होऊ नये म्हणून खुद्द मुख्यमंत्री कार्यालयाचाच दबाव असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
एखादा नैतिकदृष्ट्या प्रगल्भ मुख्यमंत्री असता, तर त्यांनी तातडीने या ३०० प्रकल्पांना स्थगिती दिली असती, असे राऊत म्हणाले. जे मुख्यमंत्री अजितदादांविरोधातील संशयास्पद मृत्यूची चौकशी करायला तयार नाहीत, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? अशी विचारणा त्यांनी केली. ‘ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी’ अशी म्हण वापरत त्यांनी ‘जैसा नरेंद्र, वैसा देवेंद्र’ अशी सडकून टीका केली.
एका बाजूला केंद्राने महाराष्ट्राला दुष्काळासाठी अद्याप ४० हजार कोटींची मदत दिलेली नाही, तर दुसरीकडे मुंबईचे ४० हजार कोटींचे नुकसान करणारा एसआरए घोटाळा राजरोसपणे सुरू आहे. एवढा मोठा घोटाळा सुरू असताना डोळ्यांवर मफलर बांधून बसला आहात का? असा खोचक सवाल करत त्यांनी मफलरचे फार तर दहा हजार रुपये लागतील, ते आम्ही देऊ, असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला.
सध्या केवळ बिल्डर पैसा कमवत आहेत, मात्र गरिबांकडे पैसा नाही आणि शेतकऱ्यांनाही मदत मिळत नाही, हे अर्थव्यवस्था कोलमडल्याचे लक्षण असल्याचे राऊत म्हणाले. पंतप्रधान मोदी फिरत असून तिरंगा उचलण्याची नौटंकी करत आहेत, ती त्यांनी थांबवावी. प्रत्येक राष्ट्राध्यक्षांनी कुठे उभे राहायचे हे ठरलेले असते, कोणीही तिरंगा रस्त्यावर टाकला नव्हता, असे त्यांनी सुनावले.
ज्या लोकांनी ५० वर्षे आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकवला नाही, त्यांना आता तिरंग्याचा उमाळा आल्याचे आश्चर्य वाटते, असे सांगत ही नौटंकी बंद करा आणि खाली बसून अर्थव्यवस्थेवर मार्ग काढा, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- रविकांत तुपकरांचा मायक्रो फायनान्स आणि बँकांना इशारा; ‘दुष्काळ सोसण्याचा ठेका फक्त शेतकऱ्यांचा आहे का?’
- ‘लेकराचा श्वास कोंडतोय, रस्ता द्या हो…’; ट्रॅफिकमध्ये दीड तास रुग्णवाहिका अडकल्याने चिमुकल्याचा आईच्या कुशीत अंत
- ‘पुन्हा एकदा फाळणी व्हावी’, बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या वक्तव्याने उडाली खळबळ








