अलिबाग, 18 नोव्हेंबर: रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातून एक अत्यंत मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. खेळता खेळता घशात फुगा अडकलेल्या एका चिमुकल्याला उपचारासाठी घेऊन जाणारी रुग्णवाहिका रस्त्यावरील वाहतूककोंडीत तब्बल दीड तास अडकून पडली. उपचारांना उशीर झाल्यामुळे या दीड वर्षांच्या बाळाने आईच्या कुशीतच तडफडून प्राण सोडले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्हा सुन्न झाला आहे.
अलिबाग तालुक्यातील बामणगाव नाक्यावर भाजी विक्रीचा व्यवसाय करणारे सुशील ठाकूर यांचा आरांश (वय १ वर्ष ८ महिने) हा धाकटा मुलगा होता. सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घराच्या अंगणात खेळताना आरांशने अचानक एक फुगा गिळला. हा फुगा त्याच्या घशात अडकल्याने त्याचा श्वास कोंडला आणि त्याला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागला. मुलाची ही गंभीर अवस्था पाहून घाबरलेल्या पालकांनी त्याला तत्काळ अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली.
बाळाला घेऊन जाणारी ही रुग्णवाहिका बेलकडे-अलिबाग मार्गावरून जात असताना तिथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे मोठ्या वाहतूककोंडीत अडकली. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी थोडीही जागा नव्हती. रुग्णवाहिकेचा सायरन सतत वाजत होता आणि ‘माझ्या लेकराचा श्वास कोंडतोय, कोणीतरी रस्ता द्या हो…’ असा काळीज चिरणारा आक्रोश आई-वडील करत होते. मात्र, रस्ता काढण्यासाठी कोणीही नसल्याने तब्बल दीड तास रुग्णवाहिका तिथेच खोळंबली.
दीड तासांच्या जीवघेण्या प्रतीक्षेनंतर अखेर रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी मार्ग मिळाला. मात्र, दुपारी चार वाजता रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचली, तेव्हा खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करून चिमुकल्या आरांशला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेनंतर अलिबाग परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल वैद्यकीय तसेच प्रशासकीय चौकशी करून संबंधित रस्त्याचा ठेकेदार आणि प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुण्यात भिडे पूल वाहतुकीसाठी बंद; ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत राहणार बंद, ‘हे’ पर्यायी मार्ग वापरा
- प्रशासनात मोठे फेरबदल; राज्यातील तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
- बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दीपक केसरकरांना शिवसैनिकांचा विरोध; ‘पन्नास खोके’च्या घोषणाबाजीने वातावरण तापले








