कुंडा, 18 नोव्हेंबर: बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. प्रतापगढमधील कुंडा येथे आयोजित रामकथेदरम्यान त्यांनी थेट देशाच्या फाळणीवर भाष्य केले. “पुन्हा एकदा फाळणी व्हावी आणि पाकिस्तानमधील सर्व हिंदूंनी भारतात यावे,” असे विधान त्यांनी केले. तसेच पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
सध्या सनातन धर्माला मुस्लिमांकडून जितका धोका नाही, तितका तो हिंदूंकडूनच असल्याचे बाबांनी म्हटले आहे. काही हिंदू आपल्याच धर्मावर कलंक असल्याचा दावा त्यांनी केला. प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावरील त्यांच्या पूर्वीच्या टिप्पणीनंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. “आमच्या नजरेत राघव आणि माधव, तसेच श्याम आणि राम यांच्यात कोणतेही अंतर नाही. यादव आणि माधव दोन नसून एकच आहेत. आपण सर्व हिंदू एकच आहोत,” असे धीरेंद्र शास्त्री यांनी स्पष्ट केले.
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राम मंदिर दौऱ्यादरम्यान निवडणुकीच्या काळात रामकथा आयोजित करण्यावरून निशाणा साधला होता. यावर प्रतिक्रिया देताना बागेश्वर बाबा म्हणाले की, त्यांची रामकथा निवडणुकीसाठी नसून ती केवळ सनातन धर्मासाठी आहे. त्यांनी मथुरेतील भगवान श्रीकृष्ण जन्मभूमीची मागणी करत, लवकरच आपण वृंदावन येथील ठाकूर धाममध्ये भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे सांगितले.
हिंदूंमध्ये एकजुटता राहावी आणि त्यांच्यात कोणताही वाद होऊ नये यासाठी आपण शंभर वेळा माफी मागायला तयार असल्याचे बागेश्वर बाबा म्हणाले. “मी गोळी खायला तयार आहे, पण हिंदूंमध्ये वाद होऊ नये, त्यांच्यात एकजूट राहावी,” अशी भूमिका धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मांडली.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुण्यात भिडे पूल वाहतुकीसाठी बंद; ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत राहणार बंद, ‘हे’ पर्यायी मार्ग वापरा
- प्रशासनात मोठे फेरबदल; राज्यातील तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
- बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दीपक केसरकरांना शिवसैनिकांचा विरोध; ‘पन्नास खोके’च्या घोषणाबाजीने वातावरण तापले








