प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या १९८९ च्या पहिल्या पाकिस्तान दौऱ्यातील काही खास आठवणींना उजाळा दिला आहे. दिग्गज फिरकीपटू अब्दुल कादिर यांना मारलेले प्रसिद्ध षटकार आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. मात्र, सियालकोट कसोटीत केलेली ५७ धावांची खेळी या षटकारांपेक्षाही जास्त महत्त्वाची होती, असे तेंडुलकरने म्हटले आहे.
एमसीए (MCA) शरद पवार म्युझियममध्ये ‘बॅटोग्राफी’ (Batography) विभागाच्या उद्घाटनावेळी तेंडुलकरने या जुन्या आठवणी शेअर केल्या. या प्रदर्शनात त्याच्या कारकिर्दीतील विविध टप्प्यांवरील २५ बॅट ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये त्याच्या बालपणीच्या पहिल्या बॅटसह २०१२ मध्ये १०० वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्यासाठी वापरलेल्या बॅटचाही समावेश आहे.
पाकिस्तान दौऱ्याची आठवण सांगताना सचिनने पेशावरमधील एक रंजक किस्सा सांगितला. मुसळधार पावसामुळे तो आंतरराष्ट्रीय सामना रद्द करण्यात आला होता. पण सामना पाहण्यासाठी २५ ते ३० हजार प्रेक्षक आल्याने त्यांच्या मनोरंजनासाठी २० षटकांचा एक प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला. टी-२० शैलीतील सामना खेळण्याचा तो सचिनचा पहिलाच अनुभव होता.
या सामन्यात सचिनने अवघ्या १८ चेंडूंत ५३ धावा चोपताना मुश्ताक अहमद आणि अब्दुल कादिर यांच्या गोलंदाजीवर मोठे षटकार मारले. तरुण फिरकीपटूला मारण्याऐवजी आपल्या गोलंदाजीवर हल्ला करण्याचे आव्हान कादिर यांनी दिले होते. सचिनच्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आणि कादिर यांनीही नंतर त्याच्या खेळाचे कौतुक केले.
तेंडुलकर म्हणाला, “ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मी जेव्हा घरी परतलो, तेव्हा मला जाणवलं की लोकांना ती षटकारबाजी खूप आवडली होती – मी १७ चेंडूंत (१८ चेंडू) ५३ धावा केल्या होत्या.”
असे असले तरी, या दौऱ्यातील आपली सर्वात महत्त्वाची खेळी सियालकोटमधील चौथ्या कसोटीत आली, असे सचिनचे मत आहे. भारताच्या दुसऱ्या डावात संघाची स्थिती ४ बाद ३४ अशी बिकट असताना या तरुण फलंदाजाने १९३ मिनिटे खेळपट्टीवर उभे राहत १३४ चेंडूंत ५७ धावा केल्या होत्या.
त्याच्या या मोलाच्या खेळीमुळे भारताला कसोटी सामना वाचवण्यात यश आले आणि चार सामन्यांची मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. याबद्दल बोलताना तो म्हणाला, “माझ्या कारकिर्दीला कलाटणी देणारी खेळी चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात आली, जेव्हा भारताची अवस्था ४ बाद ३४ होती आणि मी (काहीशा) ५७ किंवा ५८ धावा केल्या होत्या, आणि तो त्या खेळीचा फोटो आहे. त्या खेळीने आमच्यासाठी मालिका वाचवली, पण लोकांना फक्त ते चौकार आणि षटकार आठवतात.”
भारताच्या माजी कर्णधाराने आपला क्रिकेटचा प्रवास कसा सुरू झाला, याचा बालपणीचा किस्साही सांगितला. त्याची मोठी बहीण सविता काश्मीरच्या सहलीला गेली होती. ती आपल्यासाठी सफरचंद आणि सुकामेवा आणेल, अशी सचिनची अपेक्षा होती, पण तिने त्याला आश्चर्याचा धक्का देत एक क्रिकेटची बॅट भेट दिली. ती बॅट त्याच्या बालपणाची कायमची सोबती बनली.
सचिनने सुमारे दोन वर्षे कोणत्याही स्टिकरशिवाय (Blank Bat) बॅट का वापरली, याचे कारणही स्पष्ट केले. दारू आणि तंबाखूच्या ब्रँडशी संबंधित प्रायोजकत्व स्वीकारायचे नाही, असा निर्णय त्याच्या कुटुंबाने घेतला होता. १९९६ च्या विश्वचषकादरम्यान, एका परदेशी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी त्याच्या सर्व अटी मान्य केल्या.
तरीही, विश्वचषक स्पर्धा संपेपर्यंत आपल्या बॅटवर त्या कंपनीचे स्टिकर न लावण्याचा निर्णय सचिनने घेतला. तो आधीच कोऱ्या बॅटने धावा करत होता आणि भारताच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कारही जिंकला होता.
📌 महत्वाच्या बातम्या
- रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर ‘मफलरमॅन’ उल्लेख करत गंभीर आरोप, सत्यजीत तांबेंची पोस्टद्वारे एन्ट्री
- राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; आईच्या पुस्तक प्रकाशनात सांगितला केंब्रिजमधील किस्सा
- SRA आरोपांवरून प्रताप सरनाईक यांचा संजय राऊतांवर पलटवार; अपना घर घोटाळ्याप्रकरणी दिला कारवाईचा इशारा








