प्रशांत महासागरातील ‘एल निनो’चा धोका वाढला; २०२७ च्या सुरुवातीला भारताच्या मान्सूनवर काय परिणाम होणार?

प्रशांत महासागरातील एल निनो अधिक शक्तिशाली होत असून २०२७ च्या सुरुवातीपर्यंत त्याचा फटका भारतासह अनेक देशांच्या हवामान आणि शेतीवर होण्याची शक्यता आहे.

Published On: 

El Nino weather pattern affecting global climate and Indian monsoon

प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान झपाट्याने वाढत असून, एल निनोचा प्रभाव अधिक तीव्र होत आहे. अमेरिकेच्या ‘नोआ’ (NOAA – हवामान अंदाज केंद्र) या संस्थेने १२ नोव्हेंबर रोजी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च २०२७ या कालावधीत ‘शक्तिशाली ते अतिशक्तिशाली’ एल निनो कायम राहण्याची शक्यता ७९ टक्क्यांहून अधिक आहे. या बदलामुळे जगभरातील तापमान, पर्जन्यमान, पाणीपुरवठा आणि शेतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

‘नोआ’च्या अहवालानुसार, पूर्वेकडील विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा ४ अंश सेल्सिअसने वाढले आहे. दुसरीकडे, भारतीय हवामान विभागाने (IMD) ३१ ऑक्टोबर रोजी वर्तवलेल्या अंदाजानुसार, एल निनोचा सर्वाधिक जोर डिसेंबर २०२६ च्या आसपास असेल आणि त्यानंतर त्याची तीव्रता हळूहळू कमी होईल. तरीही २०२७ च्या सुरुवातीपर्यंत हा प्रभाव टिकून राहण्याची शक्यता आहे. या संदर्भात हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी १२ नोव्हेंबर २०२६ रोजी एक ट्विट करत एल निनोच्या उच्चांकी प्रभावाचा काळ बदलत असल्याबाबत आणि धोरणात्मक निर्णयांसाठी अद्ययावत माहितीची गरज व्यक्त केली आहे.

एल निनोमुळे जागतिक स्तरावर हवामानात मोठे आणि परस्परविरोधी बदल घडू शकतात. दक्षिण अमेरिका, अमेरिकेचा दक्षिण भाग आणि पूर्व आफ्रिकेच्या काही प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याउलट दक्षिण आशियाचा काही भाग, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, मध्य अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेच्या काही भागांना कोरड्या हवामानाचा फटका बसू शकतो. यामुळे काही ठिकाणी महापूर आणि अतिवृष्टी, तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा आणि भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.

भारताच्या दृष्टीने उन्हाळी मान्सूनवर होणारा एल निनोचा परिणाम चिंताजनक ठरू शकतो. साधारणपणे या काळात मान्सून कमकुवत होण्याची शक्यता असते. मात्र, प्रत्येक वेळी असे घडत नाही. केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या आकडेवारीनुसार, १९५० सालापासून आतापर्यंत १६ वेळा एल निनोची स्थिती निर्माण झाली असून, त्यापैकी ७ वर्षांमध्ये भारतीय मान्सूनवर विपरीत परिणाम होऊन पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला आहे.

‘नोआ’च्या अंदाजानुसार २०२७ च्या सुरुवातीपर्यंत एल निनो कायम राहणार असला तरी, मान्सूनबाबत आत्ताच ठोस निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. कारण, मान्सूनवर हिंदी महासागरातील तापमान आणि ‘इंडियन ओशन डायपोल’ (IOD) यांसारख्या इतर घटकांचाही प्रभाव असतो. मात्र, पावसाचे प्रमाण घटल्यास अन्नधान्य उत्पादन, जलसाठे आणि सिंचनावर परिणाम होऊन महागाई वाढण्याची शक्यता आहे. तसेच, अतिवृष्टीचा धोका असलेल्या भागांना भूस्खलन आणि पुरासारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी आतापासूनच सज्ज राहावे लागणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही