प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: छट पूजेवरून सध्या सुरू असलेल्या वादात आता अभिनेता सोनू सूद याने उडी घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जुहू बीचवर छट पूजा साजरी करण्यास कडाडून विरोध केला आहे. मात्र, या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सोनू सूदने एक व्हिडीओ जारी करत, आपण १५ तारखेला संध्याकाळी छट पूजेसाठी जुहू बीचवर उपस्थित राहणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.
सोनू सूदने कोणत्याही राजकीय वादात न पडता केवळ पूजेसाठी जुहू बीचवर येणार असल्याचे आपल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट केले आहे. त्याच्या या भूमिकेमुळे स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवरही छट पूजेच्या आयोजनाबाबत मोठा दबाव निर्माण झाला आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावरही संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी याला पूजेच्या पावित्र्याशी जोडले आहे, तर काहींनी मनसेच्या विरोधाला राजकीय रंग असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, मनसेचे पदाधिकारी कुशल धुरी यांनी आज सकाळी ११ वाजता सांताक्रूझ पोलीस ठाण्यात जाऊन जुहू चौपाटीवरील छट पूजेविरोधात अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे. गिरगाव चौपाटीवर छट पूजेला परवानगी नाकारली असल्याने, त्याच धोरणानुसार जुहू आणि वर्सोवा चौपाटीवरही या पूजेला परवानगी देऊ नये, अशी मनसेची प्रमुख मागणी आहे.
या ठिकाणी मोठी गर्दी उसळल्यास स्थानिक रहिवाशांना अडचणी निर्माण होऊ शकतात आणि समुद्रकिनाऱ्याच्या व्यवस्थापनावरही अतिरिक्त भार पडू शकतो, असा दावा कुशल धुरी यांनी केला आहे. यापूर्वी त्यांनी उपमहापौर संजय घाडी यांची भेट घेऊनही हीच मागणी मांडली होती आणि प्रशासनाने स्थानिक भावनांचा विचार करून निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आता सोनू सूदच्या घोषणेनंतर १५ तारखेला जुहू बीचवर नेमके काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिल्यास सतेज पाटलांना कोल्हापुरातून हरवणार; चंद्रकांत पाटलांनी स्वीकारले आव्हान
- ‘त्याने मैदानात बाटलीचं झाकण काढलं होतं’, पॅट कमिन्सकडून चेंडूशी छेडछाड पाहिल्याची कबुली
- १६ तारखेला राजकीय बॉम्ब फुटणार? अजितदादांच्या अपघातामागील लोकांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण? पोस्टरने उडाली खळबळ








