प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: आजकाल खरेदी, रुग्णालयाचा खर्च, मुलांची फी किंवा प्रवासासाठी क्रेडिट कार्डचा वापर सर्रास केला जातो. मात्र, एखाद्या क्रेडिट कार्डधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास आणि त्याच्या नावावर लाखो रुपयांची थकबाकी असल्यास, ती रक्कम कोण भरणार, असा प्रश्न निर्माण होतो. ही रक्कम पत्नी किंवा मुलांना त्यांच्या वैयक्तिक बचतीतून भरावी लागते का, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.
क्रेडिट कार्ड हे ‘विना तारण’ (Unsecured) कर्जाच्या श्रेणीत येते. या कर्जासाठी घर, गाडी किंवा कोणतीही मालमत्ता बँकेकडे तारण ठेवलेली नसते. त्यामुळे कार्डधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना स्वतःच्या कमाईतून किंवा वैयक्तिक बचतीतून ही थकबाकी भरण्याची सक्ती सामान्यतः करता येत नाही.
कुटुंबीयांवर सक्ती करता येत नसली, तरी हे कर्ज संपूर्णपणे माफ होतेच असे नाही. मृत व्यक्तीने मागे ठेवलेली मालमत्ता, बँक ठेवी किंवा इतर संपत्तीतून थकबाकी वसूल करण्याचा अधिकार बँकेला असतो. उदाहरणार्थ, ३ लाख रुपयांची थकबाकी असेल आणि मृत व्यक्तीच्या नावे केवळ २ लाखांचीच संपत्ती असेल, तर कायदेशीर प्रक्रियेद्वारे बँक त्या संपत्तीतून वसुली करू शकते. मात्र, उर्वरित रकमेसाठी वारसांना त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतून पैसे भरण्यासाठी जबाबदार धरले जात नाही.
कार्डधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी तातडीने मृत्यू प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रांसह बँकेला लेखी माहिती देणे गरजेचे आहे. तसेच, संबंधित क्रेडिट कार्डवर ‘क्रेडिट शिल्ड’ किंवा विमा संरक्षण आहे का, याचीही चौकशी करावी. असे संरक्षण असल्यास विमा पॉलिसीच्या अटींनुसार थकबाकीचा दावा करता येतो.
अर्थतज्ज्ञांच्या मते, मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरण्याची चूक कुटुंबीयांनी अजिबात करू नये. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांनुसार, बँका किंवा रिकव्हरी एजंट्स वसुलीसाठी कुटुंबीयांना धमकावू किंवा त्रास देऊ शकत नाहीत. बँकेकडे तक्रार करूनही अशा प्रकारचा त्रास सुरूच राहिल्यास, कुटुंबीय थेट ‘आरबीआय’च्या लोकपालाकडे दाद मागू शकतात.
📌 महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिल्यास सतेज पाटलांना कोल्हापुरातून हरवणार; चंद्रकांत पाटलांनी स्वीकारले आव्हान
- ‘त्याने मैदानात बाटलीचं झाकण काढलं होतं’, पॅट कमिन्सकडून चेंडूशी छेडछाड पाहिल्याची कबुली
- १६ तारखेला राजकीय बॉम्ब फुटणार? अजितदादांच्या अपघातामागील लोकांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण? पोस्टरने उडाली खळबळ








