प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात वेग आला असतानाच, एक वेगळीच माहिती समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा या दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाला विरोध आहे. त्यांनी महायुतीच्या राज्यातील प्रमुखांना याबाबत स्पष्टपणे माहिती दिली असून, दोन्ही पक्ष एकत्र आल्यास भविष्यात आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
त्यामुळे सध्या तरी या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला आपली मान्यता नसल्याचे सुनेत्रा पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र, दुसऱ्या राष्ट्रवादीबाबत वेगळा विचार सुरू असल्यास किंवा ती राष्ट्रवादी महायुतीचा स्वतंत्र घटकपक्ष म्हणून एनडीएमध्ये सहभागी होणार असेल, तर त्याला आपला विरोध नसेल, असा प्रस्ताव सुनेत्रा पवार यांच्या वतीने महायुतीच्या नेत्यांना देण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार का, अशा चर्चा राज्यात रंगल्या असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून पक्षाच्या आमदारांना फोन केले जात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हा संपर्क साधला जात असून, आमदारांची भूमिका आणि सद्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेषतः विलीनीकरण करावे की करू नये आणि बदलत्या संभाव्य राजकीय समीकरणांबाबत आमदारांचे मत काय आहे, या तीन प्रमुख मुद्द्यांवर त्यांची मते जाणून घेतली जात आहेत.
दरम्यान, एकत्रीकरणाबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला. आपण आजारी असताना आणि शस्त्रक्रियेनंतर विचारपूस करण्यासाठी अजित पवार व जयंत पाटील आले असता, त्यांच्यात आपल्या उपस्थितीत ४० ते ४५ मिनिटे विलीनीकरणावर चर्चा झाल्याचा दावा भुजबळांनी केला आहे. सुनील तटकरे यांनीही याला दुजोरा दिला. या भेटीत भुजबळांनी स्वतः पुढाकार घेत ‘अजित पवार चांगले नेतृत्व करत असून सर्वांनी पुन्हा एकत्र यायला हवे’ अशी भूमिका मांडली होती.
भुजबळांच्या या प्रस्तावावर जयंत पाटील यांनी आक्षेप नोंदवला होता. ‘तुम्ही सध्या सत्तेत एनडीएसोबत आहात, त्यामुळे तुमचे मित्रपक्ष या एकत्रीकरणाला मान्यता देतील का?’ असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला होता. यावर अजित पवार आणि शरद पवार एकत्र चर्चा करून मार्ग काढतील, असे उत्तर भुजबळ यांनी दिले होते. मात्र, त्या ४० मिनिटांच्या चर्चेनंतर पुढे कोणतीही हालचाल झाली नाही, असे भुजबळांनी स्पष्ट केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अमेरिकेत सर्व विमान उड्डाणे अचानक ठप्प; ७ हजार विमानांना फटका, हजारो प्रवासी अडकले
- मीही राष्ट्रवादीत काम केलंय, बरंच काही बोलू शकतो; शिंदेसेनेच्या मंत्र्याचा सुनील तटकरेंना सूचक इशारा
- अजित पवारांच्या घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा ‘मफलरवाला नेता’ कोण? १६ नोव्हेंबरला फुटणार मोठा बॉम्ब








