मुंबई– मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. तसेच ज्ञानेश कुमार यांना पदावरून बडतर्फ करण्यासाठी त्यांच्या विरोधात लोकसभा आणि राज्यसभेत महाभियोग आणणार असल्याचेही राऊत यांनी जाहीर केले आहे. यासाठी खासदारांच्या सह्या गोळा करण्यात येणार आहेत.
ज्ञानेश कुमार यांनी फॉर्म सहामध्ये बदल करून मतदारांना त्यांच्या पूर्वजांबद्दल प्रश्न विचारल्याचा आरोप राऊत यांनी केला. “दोन निवडणूक आयुक्तांनी १० महिन्यात १४ वेळा आक्षेप घेऊनही हे बदल करण्यात आले. मतभेद असणे म्हणजे १३ कोटी मतदारांची नावे हुकूमशाही पद्धतीने वगळणे नव्हे,” अशी टीका राऊत यांनी केली. ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) हे अमित शाह यांचा ‘छोटा शकील’ आणि ‘शार्पशूटर’ असल्याचा घणाघातही त्यांनी केला.
ज्ञानेश कुमार हे घटनात्मक पदावर बसलेले माफिया असून ते सरकारच्या एजंटप्रमाणे काम करत असल्याचा दावा राऊत यांनी केला. त्यांच्या याच कारवायांमुळे भाजपने महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगालमधील निवडणुका जिंकल्याचा आरोप करत, या तिन्ही राज्यांत पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव आणि ममता बॅनर्जी यांनी केल्याचे राऊत यांनी सांगितले.
निवडणूक आयोगामध्येच ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात बंड पुकारले गेल्याचा दावा राऊत यांनी केला. सध्याचा निवडणूक आयोग म्हणजे ‘लोकशाहीचा कत्तलखाना’ बनला असून, ही संघटित गुन्हेगारी थांबवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांमुळेच शिंदे-पवार निवडणूक जिंकले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
- मुख्यमंत्रिपदाच्या १२० दिवसांनंतर प्रकाश राज यांची विजयबाबत मवाळ भूमिका; म्हणाले, “माझ्या मनात शंका, पण…”
- “ओंकार भोजने सराईत खोटारडा, प्रमोशनला येत नाही”; ‘अफरातफरी’चे दिग्दर्शक मिलिंद कवडे भडकले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










