बिडकीन | किरण काळे पाटील : डीएमआयसी परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध मुरुम उत्खनन आणि वाहतुकीवर बिडकीन पोलिसांनी (Bidkin Police) धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी विना क्रमांकाच्या हायवा चालकाला अटक करण्यात आली असून, उत्खननासाठी वापरलेला जेसीबी आणि पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणण्यासाठी वापरलेली लाल रंगाची स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे.
२१ सप्टेंबर २०२६ रोजी बिडकीन पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना, डीएमआयसी परिसरातून एक पांढऱ्या-निळ्या रंगाचा हायवा (ज्यावर ‘जय भवानी’ लिहिले होते) भरधाव वेगाने येताना दिसला. पोलिसांनी हायवा थांबवून पाहणी केली असता त्यात ६ ब्रास मुरुम आढळला. चालक प्रसाद गणेश मुळे (वय २४, रा. ढोरकीन) याच्याकडे रॉयल्टी नव्हती.
चौकशीत हा मुरुम निलजगाव येथील वसीम शेख याच्या जेसीबीने भरल्याचे समोर आले. हायवा पोलीस ठाण्यात नेत असताना ऋषी गवारे याने लाल रंगाची विना क्रमांकाची स्विफ्ट कार (VDI) आडवी लावून शासकीय कामात अडथळा आणला. त्यानंतर हायवा मालक सचिन गवारे काळ्या रंगाच्या थार गाडीतून (MH.20-3336) तेथे आला. गाडी पोलीस ठाण्यात घेतो असे सांगून त्याने हायवा चालू केला आणि मुरुम डीएमआयसी परिसरातच खाली करून पोरगावच्या दिशेने पोबारा केला.
याप्रकरणी पो.हे.कॉ. वाल्मिक निकम यांच्या फिर्यादीवरून बिडकीन पोलीस ठाण्यात (गुन्हा क्र. ५९०/२०२६) कलम ३०३(२), २२१, ३(५) बीएनएस आणि गौण खनिज कायदा कलम २१(१),(२),(३),(४),(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत २२ सप्टेंबर रोजी रात्री ढोरकीन येथे सापळा रचून चालक प्रसाद मुळे याला अटक केली. तसेच, गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली लाल स्विफ्ट कार आणि जेसीबी जप्त केला असून, पसार झालेले आरोपी आणि त्यांनी पळवलेल्या हायवाचा शोध सध्या सुरू आहे.
हायवा चालकाच्या अटकेनंतर या गुन्ह्यातील अन्य तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. कारवाईत कार आडवी लावून अडथळा आणणारा ऋषी गवारे, जेसीबी मालक वसीम शेख (रा. निलजगाव) आणि मुरुम खाली ओतून हायवा पळवून नेणारा मालक सचिन गवारे (रा. बिडकीन) हे अद्याप फरार आहेत.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी डीएमआयसी परिसरातील अवैध उत्खनन, वाहतूक करणारे आणि त्यांना यंत्रसामग्री पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्यांचीही गय केली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, पैठणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. निलेश शेळके आणि पोलीस अंमलदार सोमनाथ जाधव, वाजेद शेख, वाल्मिक निकम, दिनेश चव्हाण यांच्या पथकाने केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- “मी त्यांचं तोंडही पाहत नाही”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीत एकत्र प्रवास केल्यानंतर ओमराजेंचा पाटलांवर हल्लाबोल
- मराठवाड्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; छावा महाराष्ट्र सेनेचे आंदोलन
- पक्ष फोडणाऱ्या टोळीचे सूत्रधार ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात टाका; उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











