पैठण | किरण काळे पाटील : पैठण तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश (Marathwada Drought) परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरसकट दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी बुधवारी (दि. २३) छावा महाराष्ट्र सेनेच्या वतीने पैठण तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलकांकडून काजू-बदाम वाटप करण्यात आले.
संघटना प्रमुख किशोर पाटील शिरवत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कृषिमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनानंतर तहसीलदार ज्योती पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, पाणीटंचाई व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. आगामी रब्बी हंगामाचे नियोजनही कोलमडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांची प्रलंबित पीकविमा रक्कम तत्काळ त्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, नुकसानीचे पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ विनाविलंब द्यावा, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता व चारा नियोजन प्रभावीपणे न केल्यास आणि मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
या आंदोलनाला छावा महाराष्ट्र सेनेचे प्रदेश सल्लागार किशोर सदावर्ते, मराठवाडा प्रमुख मनोज मुरदारे, जिल्हाप्रमुख साईनाथ कर्डीले, तालुका प्रमुख अर्जुन खराद, युवक जिल्हाप्रमुख किरण काळे पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- पक्ष फोडणाऱ्या टोळीचे सूत्रधार ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात टाका; उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
- दोन दिवसांत राज्यात दुष्काळ जाहीर करणार; लातूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
- कोणी ऐऱ्यागैऱ्याने श्रेय घेऊ नये, ठाण्याला आव्हान देऊ नये; मंत्री भरत गोगावलेंचा जरांगे पाटलांवर पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











