🕒 1 min read
बीड, ता. १६: मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेतल्यानंतर, आता बंजारा समाजाकडून अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. बीडसह अनेक जिल्ह्यांत या मागणीसाठी मोर्चे काढले जात आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी ‘बंजारा आणि वंजारी एकच आहेत,’ असे केलेले वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. बंजारा समाजाचे ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘याडी’ कादंबरीचे लेखक पंजाबराव चव्हाण यांनी मुंडे यांच्या या विधानाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
पंजाबराव चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले की, बंजारा आणि वंजारी समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आणि धार्मिक मूल्य पूर्णपणे वेगळे आहेत. त्यामुळे या दोन समाजांची तुलना करणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. “या दोन्ही समाजामध्ये रोटी-बेटी व्यवहार नाही, बोलीभाषा आणि पेहरावही वेगळा आहे,” असे चव्हाण यांनी ठामपणे सांगितले.
Dhananjay Munde’s Remark on Banjara Community
‘धनंजय मुंडेंनी आमचा लढा कमकुवत करू नये’
पंजाबराव चव्हाण पुढे म्हणाले की, “धनंजय मुंडे यांचे वक्तव्य चुकीचे आहे. त्यांनी असे चुकीचे विधान करून बंजारा समाजाचा एसटी आरक्षणाचा लढा कमकुवत करू नये.” बंजारा समाज आदिम संस्कृती पाळणारा आणि मूळनिवासी आहे. ते पाड्यांवर राहतात, तर वंजारी समाज गावांमध्ये स्थिरस्थावर झालेला आहे. दोघांचे देव, चालीरिती आणि सण-उत्सव साजरे करण्याची पद्धतही वेगळी आहे.
केंद्र सरकारच्या पाचही निकषांची पूर्तता
चव्हाण यांनी सांगितले की, केंद्र सरकारने आदिवासींसाठी ठरवलेले पाचही निकष बंजारा समाज पूर्ण करतो, पण वंजारी समाज ते निकष पूर्ण करत नाही. त्यामुळे बंजारा आणि वंजारी एक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इंग्रजांच्या १९३१ च्या जनगणनेतही बंजारा समाज ‘शेड्यूल ट्राईब्स’मध्ये समाविष्ट होता आणि सरकारने नेमलेल्या इदाते आयोगानेही त्यांच्यासाठी एसटी आरक्षणाची शिफारस केली आहे.
“वंजारी समाजाचे नेते म्हणून धनंजय मुंडे काहीही बोलू शकतात, पण त्यांनी दोन्ही समाजात वाद निर्माण करून बंजारा समाजाचे नुकसान करू नये. महानायक वसंतराव नाईक यांनी बंजारा समाजाला दिलेल्या ४ टक्के आरक्षणामध्ये त्यांनी उडी घेऊ नये,” असे म्हणत चव्हाण यांनी धनंजय मुंडेंना सज्जड दम दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या हैदराबाद गॅझेटमुळे एसटी आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा जोर धरत असल्याबद्दल त्यांनी जरांगे पाटलांचे आभारही मानले.
📌 महत्वाच्या बातम्या
- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ३१ जानेवारी २०२६ पर्यंत होणार
- ‘हैदराबाद गॅझेट चुकीचा असेल तर शरद पवारांचा १९९४ चा जीआरही रद्द होणार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












