पैठण, ९ नोव्हेंबर, किरण काळे पाटील : शहापूर मानेगाव (ता. पैठण) येथील दोन तरुणांचा शेवगाव-पैठण महामार्गावरील तळणी शिवारात रविवारी (८ नोव्हेंबर) अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. परमेश्वर चांगदेव सोलाट (३७) आणि दादासाहेब सर्जेराव मतकर (३६) अशी मृतांची नावे आहेत. ऐन दिवाळीत एकाच गावातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दिवाळी आणि सोमवती अमावस्येचे औचित्य साधून हे दोघे मित्र मढी येथील कानिफनाथ आणि सावरगाव येथील मच्छिंद्रनाथ बाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन बजाज सिटी-१०० दुचाकीने गावाकडे परतत असताना, सायंकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास तळणी (ता. शेवगाव) शिवारात एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी दोघांनाही शेवगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी परमेश्वर सोलाट यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी असलेल्या दादासाहेब मतकर यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली.
सोमवारी (९ नोव्हेंबर) शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर शहापूर मानेगाव येथील एकाच स्मशानभूमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
परमेश्वर सोलाट यांनी अपघाताच्या दिवशीच ठेवलेले व्हॉट्सॲप स्टेटस आता त्यांचे अखेरचे स्टेटस ठरले आहे. ‘दिवाळीचा पहिला दिवा नाथ बाबा घरी तुम्ही यावा अन् सारं काही आनंदी आनंद व्हावा…’ आणि ‘डर नहीं लगता मुझे किस बात का, सर पे मेरे साया है बड़े बाबा मच्छिंद्रनाथ का’ असे व्हिडिओ आणि फोटोचे स्टेटस त्यांनी ठेवले होते.
या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत परमेश्वर सोलाट यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, दोन भाऊ आणि आई-वडील असा परिवार आहे. तर दादासाहेब मतकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि एक भाऊ आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- एकनाथ शिंदेंची रुग्णालयात जाऊन शरद पवारांना भेट; मुख्यमंत्र्यांकडून फोनवरून प्रकृतीची विचारपूस
- देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय: मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल
- सरकार कोणत्याही पक्षाचं असो, सत्तेत ५ मराठा मंत्री असायलाच हवेत: मनोज जरांगे पाटील
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







