🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका)- जिल्ह्यासाठी खरीप हंगाम २०२५ साठी युरिया ८००० मेट्रिक टन तर डी.ए. पी १५०० मेट्रिक टन इतका संरक्षित साठा करावयाचा आहे. त्यासाठी नियुक्त पुरवठादार संस्थांनी दिलेल्या कालमर्यादेत खत ( fertilizer ) पुरवठा करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
जिल्हास्तरीय संरक्षित खत साठा संनियंत्रण समितीची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. कृषी उपसंचालक दीपक गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ रविंद्र पाटील, जिल्हा पणन अधिकारी शशांक पडघन, प्रकल्प संचालक आत्मा धनश्री जाधव, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रशिक्षण संस्थेचे डॉ. सुर्यकांत पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय फुन्से, उपविभागीय कृषी अधिकारी आश्विनी पनरे आदी तसेच खते निर्मिती व पुरवठादार संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय संरक्षित खत साठा संनियंत्रणाकरीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत कृषी विकास अधिकारी, नियुक्त नोडल एजन्सीचे प्रतिनिधी, खत विक्रेत्यांचे प्रतिनिधी हे सदस्य तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. या समितीच्या मंजूरीनंतर महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महामंडळ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्यामार्फत संरक्षित खत साठा विक्रीसाठी उपलब्ध करावयाचा आहे.
सन २०२४-२५ च्या खरीप हंगामात सर्वप्रकारची खते मिळून ३ लाख ९१ हजार १८७ मे.टन इतकी मागणी होती तर २ लाख ८८ हजार ७०० मे. टन इतके आवंटन मंजूर झाले होते. गत हंगामात जिल्ह्यात२ लाख ८० हजार २६४ मे. टन इतकी खत विक्री झाली असून ६८ हजार ६२४ मे.टन इतका खत साठा शिल्लक होता. रब्बी हंगामात १ लाख ६७ हजार ५०० मे. टन खतांची माग्णी होती. तर १ लाख ४० हजार इतके आवंटन मंजूर होते. तर शिल्लक खत साठा १ लाख १४ हजार ३५९ मे. टन इतका आहे.मार्च २०२५ अखेर युरिया ३६ हजार ५०७ मे. टन तर डी.ए. पी. २३३१ मे.टन इतका खतसाठा शिल्लक आहे. या व्यतिरिक्त आगामी हंगामासाठी ८ हजार मे.टन युरिया तर १५०० मे. टन डी.ए. पी खतसाठा संरक्षित करावयाचा आहे. त्यासाठी नियुक्त संस्थांनी मे अखेर हा खतसाठा उपलब्ध करुन द्यावा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.पुरवठादार संस्थांनी खत पुरवठ्यासाठी दिलेल्या कालमर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे.
जल, मृद संधारण व वृक्ष लागवडीसाठी अभियान राबवावे- दिलीप स्वामी
याच बैठकीत कृषी विभागामार्फत कृषी क्षेत्रात विविध प्रयोगशील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांबाबत निवड समितीची ही बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हास्तरीय निवड समितीने निवडलेल्या शेतकऱ्यांच्या नावांबाबत चर्चा करुन त्यातून अंतिम नावे विभागीय समितीकडे पाठविण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी उपस्थितांना संबोधित करतांना सांगितले की, जिल्ह्यातील तापमान वाढ, पाणीटंचाई याविषयावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक असून यासाठी कृषी विभागाने मृद, जल संधारण तसेच वृक्ष लागवडीचे उपक्रम मोहीमस्वरुपात राबवावे,असे निर्देश दिले. त्यासाठी कृषी विभागातील तज्ज्ञांनी अन्य विभागांनाही मार्गदर्शन करावे,असेही त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- अभिनेत्री Rajeshwari Kharat ने ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर; टीका करणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांना झाप झापलं
- विधानसभा निवडणूक प्रक्रियेबाबत खोटे आरोप; निवडणूक आयोगाने फेटाळले Ranjeet Kasle यांचे दावे
- IPL 2025 : रोहित शर्माचा फॉर्म आणि मुंबई इंडियन्ससाठी नवीन चॅलेंज!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now