ठाणे, 17 ऑक्टोबर: ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या गोळ्या झाडून झालेल्या हत्येमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पूर्णेकर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांनी सरनाईक यांच्यासमोर आपला तीव्र संताप व्यक्त करत, हत्येचा आरोप असलेल्या शिंदे गटाच्या पदाधिकारी मीनाक्षी शिंदे यांना तत्काळ पदावरून हटवण्याची मागणी केली.
या हत्याकांडानंतर शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले होते. तसेच, नुकतीच या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. हत्येप्रकरणी मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर आरोप होत असून चौकशी सुरू आहे. याच दरम्यान प्रताप सरनाईक यांनी कुटुंबीयांची बाजू ऐकून घेत त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून बोलणे करून दिले. तसेच, न्यायासाठी वकिलांची फौज उभी करू, असे आश्वासनही सरनाईक यांनी दिले.
संतापलेल्या प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नीने तपासाच्या पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले. "ती महिला राजरोसपणे फिरत आहे. राजा शिंदेंची चौकशी म्हणजे केवळ चहापाणी देऊन सोडण्याचा प्रकार आहे. आमच्यासमोर त्यांना फाशी झाली पाहिजे," अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर, पूर्णेकर यांच्या वहिनीनेही आक्रोश मांडताना, "सत्तेपेक्षा माणुसकी मोठी असते. शिंदेसाहेब तिच्या पाठीशी आहेत. तुम्ही सर्वांवर ईडी लावता, मग तिच्याकडे अचानक एवढे पैसे कुठून आले?" असा सवाल करत मीनाक्षी शिंदे यांच्या हकालपट्टीची मागणी केली. राम पूर्णेकर यांच्या हत्येच्या दिवशी हेल्मेट घातलेली व्यक्ती राजा शिंदेच असल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी यासंबंधीचे सर्व पुरावेही दिल्याचे पाहायला मिळाले.
कुटुंबीयांना धीर देताना सरनाईक म्हणाले की, "तुमच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. प्रदीप यांच्या हत्येचे सर्वांनाच दुःख आहे. भर चौकात फाशी द्या, मी वैयक्तिक पातळीवर वकिलांची फौज उभी करतो." या प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकारणावर बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गैरसमज न बाळगण्याचे आवाहन केले. "शंभर वेळा फोन करूनही जे कधी ठाण्यात येत नाहीत, ते आता केवळ राजकारण करण्यासाठी इथे आले," असा टोला त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. पहिल्या दिवसापासून आपण संपर्कात असून, रामसोबत परवा आणि आजही बोलणे झाले आहे; मात्र माहोल तसा असल्याने सुरुवातीला येणे टाळल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- बीसीसीआय निवड समिती: अजित आगरकर यांची जागा घेणार रमेश पोवार? ज्युनियर समितीसाठी डोडा गणेश शर्यतीत
- ‘भाजप जे देईल ते त्यांना घ्यावं लागतं’; पदवीधर निवडणुकीवरून अंबादास दानवेंचा राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेवर हल्लाबोल
- मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील: सुषमा अंधारेंचा दावा
Quick Answers
पूर्णेकर कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत हत्येचा आरोप असलेल्या शिंदे गटाच्या पदाधिकारी मीनाक्षी शिंदे यांना पदावरून तत्काळ हटवण्याची मागणी केली.
या हत्येप्रकरणी शिंदे गटाच्या पदाधिकारी मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर (राजा शिंदे) आरोप होत आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे.
कुटुंबीयांवर कोणताही अन्याय होणार नाही असे सांगत सरनाईक यांनी न्यायासाठी वैयक्तिक पातळीवर वकिलांची फौज उभी करण्याचे आश्वासन दिले.
हत्याकांडानंतर शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले होते, तसेच या कुटुंबीयांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






