नागपूर, 14 नोव्हेंबर: नागपूरच्या अत्यंत वर्दळीच्या मेडिकल चौकात गुरुवारी रात्री उशिरा कुख्यात गुंड पलाश वासनिक याची निर्घृण हत्या करण्यात आली. भररस्त्यात चाकूने वार करून आणि डोक्यावर सिमेंटची कुंडी टाकून त्याला संपवण्यात आले. या थरारक घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गुरुवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास मेडिकल कॉलेजच्या गेटजवळ हा थरार घडला. हल्लेखोरांनी सुरुवातीला पलाशवर चाकूने सपासप वार केले. तो जमिनीवर कोसळल्यानंतर त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सिमेंटची कुंडी घालून डोकं छिन्नविछिन्न करण्यात आले. या भीषण हल्ल्यात पलाशचा जागीच मृत्यू झाला, तर घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले.
मृत पलाश वासनिकवर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. विशेष म्हणजे, ‘एमपीडीए’ (MPDA) अंतर्गत कारवाई झाल्यानंतर तो अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. या हत्येमागे कौटुंबिक वाद असल्याची प्राथमिक चर्चा आहे. पलाश स्वतःच्या बहिणीला त्रास देत होता, याच कारणातून त्याचा मेहुणा चिंटू ऊर्फ आयुष धुपे याने साथीदारांच्या मदतीने हा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या माहितीला अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
हत्येच्या घटनेनंतर मेडिकल चौकात नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसरात बॅरिकेडिंग केले असून, फरार आरोपींचा शोध आणि हत्येच्या नेमक्या कारणाचा कसून तपास सुरू आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- जास्वंदाच्या तेलाने थांबेल केस गळती आणि केसांना मिळेल पोषण; जाणून घ्या तेल बनवण्याची सोपी कृती
- देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिल्यास सतेज पाटलांना कोल्हापुरातून हरवणार; चंद्रकांत पाटलांनी स्वीकारले आव्हान
- ‘त्याने मैदानात बाटलीचं झाकण काढलं होतं’, पॅट कमिन्सकडून चेंडूशी छेडछाड पाहिल्याची कबुली








