प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: 'होणार सून मी ह्या घरची' आणि 'मुरांबा' फेम अभिनेता शशांक केतकर, तसेच अभिनेत्री मृणाल दुसानिस यांच्यासह अनेक कलाकारांनी मानधन थकवल्याचा आरोप केल्यानंतर आता निर्माते आणि दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी या प्रकरणावर मौन सोडले आहे. 'मराठी मिडीयम' या नव्या मालिकेतून कमबॅक करत असलेल्या देवस्थळी यांनी नुकतीच 'अल्ट्राबझ'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मानधन बुडवल्याच्या आरोपांवर आपली बाजू स्पष्ट केली आहे.
या आरोपांना उत्तर देताना मंदार देवस्थळी म्हणाले, "मी मुद्दाम ठरवून उत्तर देत नव्हतो असे नाही, कारण त्या 'का आणि केव्हा'ची उत्तरे माझ्याकडे नव्हती. मी हे सर्व ठरवून किंवा मुद्दाम केलेले नाही. कलाकारांचे पैसे बाकी ठेवून मी कोणतेही बंगले बांधलेले नाहीत किंवा फार्महाऊस घेतलेले नाही. माझे एक व्यावसायिक गणित चुकले आणि त्यामध्ये मला मोठा फटका बसला. कदाचित मी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे ते घडले असावे."
त्यावेळी आपल्याकडे काम नसल्याचे सांगत देवस्थळी यांनी पुढे स्पष्ट केले की, "आता माझे पुन्हा एकदा काम सुरू होत आहे, याशिवाय मी दुसरे काहीही करू शकत नाही. मला यातूनच उभे राहायचे आहे. मी कोणतीच गोष्ट नाकारत नाही, त्यांच्या जागी ते बरोबर आहेत आणि माझ्या ठिकाणी मी बरोबर आहे. काम सुरू झाल्यामुळे आता पुढील गोष्टी सामोपचाराने मिटतील आणि त्याचे उत्तर आपोआप मिळेल."
जुन्या गोष्टी उकरून काढण्यात अर्थ नसल्याचे ते म्हणाले. "जे घडून गेले ते मी कुठेही विसरलेलो नाही. मिळालेल्या संधीतून मला उभे राहायचे आहे आणि पूर्वी जे घडले त्यावर चांगल्या पद्धतीने पडदा टाकायचा आहे. हेच माझे ध्येय असून त्यासाठी नव्या जोमाने काम करायचे आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रेक्षकांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची अपेक्षा व्यक्त करताना देवस्थळी म्हणाले की, त्यांना एक नवीन मालिका चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणायची आहे. ज्यांचे आपल्याबद्दलचे पूर्वग्रह दूषित झाले आहेत, ते पुन्हा एकदा चांगले करायचे आहेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
'सुखांच्या सरींनी… हे मन बावरे' (२०१८-२०२०) या मालिकेनंतर मंदार देवस्थळींवर कलाकारांचे मानधन थकवल्याचा आरोप झाला होता. या मालिकेत शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस मुख्य भूमिकेत होते. मालिकेमुळे देवस्थळींचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. कलाकारांनी थकवलेल्या मानधनाचा मागोवा घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला होता, मात्र त्यावेळी समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार कलाकारांनी केली होती.
📌 महत्वाच्या बातम्या
- नाना पाटेकरांना फडणवीसांनी दिली होती लोकसभेची ऑफर; आशिष शेलारांनी शोकसभेत सांगितला ‘तो’ किस्सा
- थंडीमुळे निळे पडले होते ओठ, तरीही शिफॉन साडीत शूट झालं ‘ते’ गाणं; २६ वर्षांनंतरही क्रेझ कायम
- गॅलेक्सी अपार्टमेंटच्या खोलीत राहायची अदृश्य शक्ती? सलमान खानचा ‘कॉफी विथ करण 9’मध्ये थरारक खुलासा
Quick Answers
अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री मृणाल दुसानिस यांच्यासह अनेक कलाकारांनी मंदार देवस्थळी यांच्यावर मानधन थकवल्याचा आरोप केला होता.
त्यांचे एक व्यावसायिक गणित चुकल्यामुळे त्यांना मोठा फटका बसला आणि कदाचित घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे हे घडले असावे, असे देवस्थळी यांनी सांगितले.
मंदार देवस्थळी हे 'मराठी मिडीयम' या नव्या मालिकेतून कमबॅक करत आहेत.
हा आरोप 'सुखांच्या सरींनी... हे मन बावरे' (२०१८-२०२०) या मालिकेच्या संदर्भात झाला होता.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







